नवी दिल्ली - नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा ‘झुंड’ (Jhund) हा सिनेमा रिलीज झाला आणि या सिनेमावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. समीक्षकांनी या चित्रपटाला मनापासून दाद दिली. प्रेक्षकांनीही सिनेमाला पसंती दर्शवली. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेकांनी या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून नागराजचं कौतूक होत आहे. आता, देशातील नामवंत अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी नागराजला 21 व्या शतकातील सत्यजीत रे असल्याचं म्हटलं आहे.
बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान पासून साऊथचा सुपरस्टार धनुषपर्यंत सगळ्यांनी ‘झुंड’ (Jhund) बनवणाऱ्या नागराज यांची पाठ थोपटली आहे. तर, केंद्रीयमंत्री नितीन गडकरींपासून आता नरेंद्र जाधव यांनीही झुंड पाहिल्यानंतर नागराजचं कौतूक केलं. नागराज हा 21 व्या शतकातील सत्यजीत रे असल्याचं त्यांनी म्हटलं. सत्यजीत राय हे
'बुधवार 9 मार्च 2022 रोजी नवी दिल्ली येथे झुंड सिनेमा पाहिला. नागराज मंजुळे हे 21 व्या शतकातील सत्यजित रे आहेत. अस्सल आणि वास्तववादी समाजचित्रण तर ते करतातच, पण त्याहूनही महत्वाचे म्हणजे ते सामाजिक संदेश देवून जातात, त्यांना दिगंत किर्ती लाभो ही सदिच्छा!', असा संदेश जाधव यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिला आहे. दरम्यान, मराठी अभिनेता सुबोध भावे, जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव यांनीही ‘झुंड’ आणि नागराज यांना मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. सिद्धार्थने नागराजचं तोंड भरुन कौतूक केलंय. तर, अभिनेता रितेश देशमुखनेही नागराज आणि झुंडचं कौतूक केलं आहे.
कोण आहेत सत्यजीत रे
सत्यजीत रे हे केवळ आपल्याच देशातील नव्हे, तर बहुधा जगातील सर्वाधिक पुरस्कार मिळविणारे दिग्दर्शक असावेत. 20 व्या शतकातील सर्वोत्तम दिग्दर्शक म्हणून त्यांनी ओळख आहे. पथेर पांचाली हा त्यांचा 1955 साली प्रदर्शित झालेला चित्रपट जगभर गाजला होता. त्यांनी एकूण 37 चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ते मूळचे कोलकाता येथील होते, कला, साहित्य क्षेत्रात त्यांचं नाव मोठं असून ते महान चित्रकारही होते. ढोबळमानाने त्यांचे प्रत्येक चित्र हे प्रादेशिक वा राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय स्तरांवर पुरस्कार मिळविणारे ठरते. अनेक चित्रांनी तर पुरस्कारांचा जणू विक्रमच केलेला आहे. वैयक्तिक बहुमानांसंदर्भातही सत्यजीत रे यांच्याइतके मान-सन्मान क्वचितच अन्य कोणा सिनेकर्मींच्या वाट्याला आलेले असावेत.
कोण आहेत नरेंद्र जाधव
डॉ. नरेंद्र जाधव हे देशातील नामांकित अर्थतज्ज्ञ असून त्यांनी रिर्झव्ह बॅंकेत ३१ वर्षे सेवा दिली. भारतीय अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, लेखक व समाजशास्त्रज्ञ म्हणूनही ते परिचीत आहेत. अर्थशास्त्र आणि ललित साहित्य तसेच इतर समाजिक विषयांवर मराठी, हिंदी व इंग्लिश भाषांत त्यांनी लेखनही केले आहे, सध्या निती आयोग असलेल्या आणि पूर्वी नियोजन मंडळ या नावाने ओळखले जाणाऱ्या मंडळाचे ते माजी सदस्य आहेत. जाधव यांनी ऑक्टोबर २००८ मध्ये 'प्रिन्सिपल ॲडव्हायजर ॲन्ड चीफ इकॉनॉमिस्ट' या पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली. रिझर्व बॅंकेत असताना ते अफगाणिस्तान सेंट्रल बॅंकेचे प्रमुख सल्लागार होते व साडेचार वर्षे 'आंतरराष्ट्रीय नाणेनिधी'मध्येही होते. तसेच ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते.