ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 27 - सियाचीनमध्ये तब्बल सहा दिवस उणे ४५ तापमानात 25 फूट बर्फाखाली गाडले गेलेल्यानंतरही सहा दिवसांनंतर बाहेर आलेले जिगरबाज लान्सनायक हनुमंतप्पा कोप्पड यांनी मृत्यूशी दिलेली झुंज आपल्याला माहीत आहेच. आज त्यांची पुन्हा आठवण करून देणारा पराक्रम बेळगावमधील मेजर श्रीहरी कुगजी यांनी केला आहे. १५ फूट बर्फाखाली अडकलेल्या कुगजी यांनी कुलुपाने बर्फ फोडून मृत्यूवरही मात केली.जम्मू-काश्मीरमधील सोनमर्गमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड हिमवृष्टी होतेय. मेजर श्रीहरी कुगजी याच भागात कर्तव्य बजावत होते. त्यावेळी हिमस्खलनामुळे छावणीचं छप्पर कोसळलं आणि ते १५ फूट बर्फाखाली अडकले. सुटकेचा मार्गच दिसत नव्हता. ते अशा ठिकाणी होते की बचाव पथकाच्या दृष्टीस पडणंही अशक्य होतं. पण जिगरबाज कुगजी यांनी हार न मानता लढायचं ठरवलं. बर्फ फोडण्यासाठी काही हाती लागतंय का, यासाठी झटापट सुरू केली. तेव्हाच त्यांच्या हाती ट्रँकेचं कुलूप लागलं आणि त्यांच्या आशा पल्लवित झाल्या. प्रयत्नांची पराकाष्ठा करत त्यांनी कुलुपाने बर्फ फोडण्यास सुरुवात केली. हळूहळू त्यांचं एकेक बोट बर्फाबाहेर येऊ लागलं. साधारण तीन तास ते झगडत होते. त्याला नशिबाची साथ मिळाली आणि बचाव पथकाला कुगजी यांची बोटं दिसली. त्यानंतर, सहकारी जवानांनी बर्फ फोडून त्यांना बाहेर काढलं आणि या जिद्दीपुढे मृत्यूनं गुडघे टेकले. दरम्यान, श्रीहरी कुगजी अजूनही सोनमर्गमध्येच आहेत. रस्त्यावर चार फूट बर्फाचा थर असल्यानं वाहतूक पूर्णपणे बंद आहे आणि हवामान खराब असल्याने हेलिकॉप्टरही तिथे पोहोचू शकत नाहीए. परंतु, त्यांचा पराक्रम बेळगावपर्यंत पोहोचला असून या धाडसाला सगळेच सलाम करत आहेत.
जिगरबाज...त्या जवानांने कुलुपाने बर्फ फोडून मृत्यूवरही केली मात
By admin | Published: January 27, 2017 7:20 PM