जालंधर - आमदार जिग्नेश मेवाणी यांनी पंजाबमधील राजकीय दौऱ्यावेळी मायावतींच्या बहुजन समाज पक्षात येण्याची तयारी असल्याचे म्हटले. सध्या कुठल्याही राजकीय पक्षाशी आपलं मत जुळून येत नाही. मात्र, बसपच्या अध्यक्षा मायावतींनी निमंत्रण दिल्यास आपण बसपमध्ये जाऊ शकतो, असे अपक्ष आमदार असलेल्या जिग्नेश यांनी पंजाबमधील पत्रकारांशी बोलताना म्हटले.
पंजाबमध्ये राजकीय दौरा करण्यासाठी मेवाणी यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी बोलताना, मी दर महिन्याला पंजाबचा दौरा करणार असून त्यानंतच राजकीय पक्षांसोबत जाण्याचा विचार करेल, असे मेवाणी यांनी म्हटले. देशावर राज्य करणाऱ्या इतर पक्षांनी अनेक वाईट कामे केली असतील, पण त्यांनी संविधान जिवंत ठेवलं आहे. मात्र, भाजपाचे अनेक नेते संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे संविधानाला बदलण्याची भाषा करणाऱ्यांनाच बदलणे आवश्यक असल्याचे जिग्नेश मेवाणी यांनी म्हटले.