अहमदाबाद - गुजरातच्या वडगाव मतदारसंघातील अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांनी विधानसभा सभागृह आवारात विधेयकाची प्रत जाळल्याने गोंधळ उडाला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी डेव्हलपमेंट विधेयक गुजरात विधानसभा सभागृहात मांडण्यात येणार होते. मात्र, त्यापूर्वीच जिग्नेश यांनी विधानसभा परिसरात या विधेयकाची प्रत जाळली. गुजरात विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे.
जिग्नेश मेवाणी यांना गुजरात विधासनभा अधिवेशनातील तीन दिवसांच्या कामकाजासाठी निलंबित करण्यात आलं आहे. संविधानाच्या मुद्द्यावरुन जिग्नेश यांनी विधानसभेत आक्रमक भाषण केलं होतं, यावेळी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि विधानसभा अध्यक्षांना संविधानाच्या मुद्द्यावरील विसंगतीवरुन प्रश्न विचारले होते. गुजरात विधानसभा सभागृहातील तीन दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संविधान दिन साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मुख्यमंत्री रुपाणी यांनी ठेवला होता. त्यास, मेवाणी यांनी विरोध केला होता. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी सभागृहातील बेशिस्त आणि गैरवर्तुणुकीचा दाखला देत जिग्नेश मेवाणी यांना 3 दिवसांसाठी निलंबित केले आहे.