नवी दिल्ली - गेले काही दिवस मोठा गाजावाजा केल्यानंतर आज कन्हैया कुमार यांना काँग्रेसने पक्षात प्रवेश दिला. यावेळी कन्हैया यांच्यासोबत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी हे सुद्धा उपस्थित होते. मात्र राहुल गांधींच्या उपस्थितीत झालेल्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतरही जिग्नेश मेवानी यांनी काँग्रेसचे औपचारिक सदस्यत्व स्वीकारले नाही. त्यानंतर स्वत: जिग्नेश मेवानी यांनी असं करण्यामागचं कारण सांगितलं आहे. (Jignesh Mewani did not join the Congress today, he later explained)
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जिगिनेश मेवानी यांनी सांगितलं की, काही तांत्रिक कारणांमुळे आज मी काँग्रेसमध्ये प्रवेश करत नाही. मी सध्या गुजरात विधानसभेमध्ये अपक्ष आमदार आहे. जर मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर मी आमदार म्हणून काम करू शकणार नाही. मात्र जिग्नेश मेवानी यांनी ते काँग्रेसच्या विचारसरणीसोबत आहेत. तसेच त्यासोबतच पुढे कार्य करत राहतील, असे सांगितले. तसेच गुजरातच्या पुढील निवडणुकीत मी काँग्रेसच्या निवडणूक चिन्हासह निवडणुकीच्या मैदानात उतरेन असेही जिग्नेश मेवानी यांनी यावेळी स्पष्ट केले.
दुसरीकडे कन्हैया कुमार यांनी आज काँग्रेसमध्ये औपचारिकरीत्या प्रवेश केला. यादरम्यान, कन्हैया कुमार यांनी देशातील सर्वात जुन्या आणि लोकशाहीवादी पक्षात प्रवेश करत असल्याचा अभिमान असल्याचे सांगितले. काँग्रेस हा देशातील सर्वात मजबूत विरोधी पक्ष आहे. तसेच जर काँग्रेस पक्ष राहिला नाही तर देशही राहणार नाही, असे सांगितले.