नवी दिल्ली - काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांनी केलेल्या काश्मिरी पंडित सरपंच अजय पंडिता यांच्या हत्येनंतर काश्मीरमधील वातावरण तापले आहे. तसेच दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित व्यक्तीची हत्या केल्याने काश्मिरी पंडितांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, रोखठोक मत मांडण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कंगना राणौत हिनेही या प्रकरणात प्रतिक्रिया देताना अजय पंडिता यांच्या हत्येबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
कंगनाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून बॉलिवूडवरसुद्धा जोरदार टीका केली आहे. काश्मिरी पंडित असलेल्या अजय पंडिता यांच्या हत्येबाबत बॉलीवूडने पाळलेल्या मौनावर कंगनाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सेक्युलँरिझमचे धडे शिकवणारे आता गप्प बसले आहेत, असे सांगत कंगनाने बॉलिवूडच्या सिलेक्टिव्ह भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत. काही अभिनेते मेणबत्त्या आणि पेट्रोल बॉम्ब घेऊन देशाला जाळण्यासाठी रस्त्यावर उतरतात. मात्र अशा.मुद्द्यावर मौन पाळतात.
दरम्यान, काश्मिरी पंडितांना पुन्हा एकदा काश्मीर खोऱ्यात परतता आले पाहिजे, त्यांना त्यांची भूमी पुन्हा मिळाली पाहिजे. तसेच काश्मीर खोऱ्यात पुन्हा हिंदू धर्माची स्थापना झाली पाहिजे, अशी मागणी कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.
दरम्यान, माझे वडील आयुष्यात कुणाला घाबरले नाहीत. ना मी कुणाला घाबरते, अशा शब्दात अजय पंडिता यांच्या मुलीने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. तसेच तिने शासन आणि प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना अजय पंडिता यांची कन्या शीन पंडिता म्हणाली की, 'माझ्या वडिलांनी संरक्षण मागितले होते. काश्मीरसारख्या प्रदेशात सरपंच बनल्यानंतर त्यांना संरक्षण मिळणे आवश्यक होते. मात्र जी गोष्ट त्यांना मिळणायला हवी होती ती त्यांना मागावी लागली. मात्र तरीही त्यांना संरक्षण मिळाले नाही, अशा शब्दांत तिने स्थानिक शासन, प्रशासन यंत्रणेबाबत संताप व्यक्त केला.