ऑनलाइन लोकमत -
काझीकोडे, दि. 12 - नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याला इस्लाम परवानगी देतं का ?, माझी दाढी वाढली आहे, माझा बॉस मला दाढी करायला सांगत आहे, काय करु ?, इस्लाम न मानणा-यांच्या सणांमध्ये मुस्लिम सहभागी होऊ शकतो का ? ऑनलाइन कोर्समध्ये मुस्लिम तरुणांकडून विचारले जाणारे हे प्रश्न सध्या केरळमध्ये चिंतेचा विषय बनले आहेत. या अशा कोर्समुळे बेपत्ता झालेले तरुण इसीस या दहशतवादी संघटनेत भरती होऊन कट्टरवादी झाले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
केरळमधील कासरगोड जिल्ह्यातील काही तरुण गेले काही दिवस बेपत्त आहेत. हे तरुण इसीसमध्ये भरती झाले असल्याचा संशय आहे. या तरुणांनी ऑनलाइन कोर्स केले होते अशी माहिती या तरुणांच्या नातेवाईकांनी दिली आहे.
सोशल मिडियावर गेले काही दिवस इस्लामचा प्रचार करणारं मल्याळम भाषेतील मजकूर प्रसिद्ध होऊ लागलं आहे. काही ब्लॉगवर इसीसवर चर्चा केली जात आहे. तसंच केरळमध्ये इस्लामच्या मुद्दयावर मुस्लिम संघटनांची काय भुमिका आहे यावरही मत मांडलं जात आहे.
'अनेक तरुण इस्लामचं पारंपारिक धार्मिक शिक्षण घेण्यापेक्षा ऑनलाइन कोर्स आणि समुदेशानाकडे जास्त आकर्षित होत आहेत. हे ऑनलाइन कोर्स भारताबाहेरुन चालवले जात आहेत', असा इस्लामिक स्कॉलर्सचा दावा आहे. हे कोर्सेस धोकादायक आहेत, कारण तुम्हाला कोण सल्ला देत आहे याची काही कल्पना नसते असं अब्दुल हमीद फैजी अम्बालक्कादवू यांनी सांगितलं आहे.
केरळमधील काही युवकांचा गट अतिरेकी संघटना आयएसमध्ये सामील झाल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर राज्यातून २१ जण बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सोमवारी विधानसभेत दिली.
कासरगोड येथून बेपत्ता झालेल्यांमध्ये चार महिला व तीन मुले आहेत. पलक्कड येथून बेपत्ता झालेल्यांमध्ये दोन महिला आहेत. हे लोक वेगवेगळी कारणे दाखवून घरांतून बेपत्ता झाले आहेत. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हे लोक सिरिया व अफगाणिस्तानमध्ये गेले आहेत व ते आयएसच्या शिबिरांमध्ये राहत आहेत. या प्रकरणाशी संबंधित कासरगोडच्या एका युवकाला मुंबई विमानतळावर ताब्यात घेतले आहे.