श्रीमंत मानेदिल्लीवरून चौखूर उधळलेले नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या अश्वमेधाचे वारू अखेर हुगळीच्या काठावर बंगालच्या वाघिणीने रोखले. वाघीणही कशी तर नंदीग्राममध्ये प्रचाराच्या सुरवातीलाच गर्दीत जखमी झालेली. तो जखमी डावा पाय घेऊनच जवळपास दोन महिने ममता बॅनर्जींनी बंगाल पिंजून काढला. व्हीलचेअरवर रोड शो केला. खूर्चीवर बसूनच प्रचारसभा घेतल्या. मोदी व शहा हे दोघे सर्वशक्तिमान नेते. त्यांचे आक्रमण असे जोरदार की प्रतिस्पर्ध्यांचा विध्वंसच होणार. त्यामुळेच देशाचा एखाददुसरा कोपराच त्यांनी पादाक्रांत होण्यापासून वाचला आहे. यावेळी ते नेते-कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन पूर्ण ताकदीनिशी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत पश्चिम बंगालवर तुटून पडले. प्रत्येक मतदारसंघ इंच इंच लढविला. भाजपचे जुने व तृणमूल व अन्य पक्षातून आलेले नवे असे सगळे मिळूनही थोडे उमेदवार कमी पडताहेत वाटले तर एक एक जागा महत्त्वाची असल्याने लोकसभा व राज्यसभेच्या मिळून पाच खासदारांनाही मैदानात उतरविले. त्यापैकी लोकसभा जिंकणारे विधानसभेत पराभूत झाले. जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे गृहराज्य जिंकणे भाजपला जमलेच नाही.
ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा विजय सोपा नव्हता. डझनावारी नेते सोडून गेल्याने पक्ष खिळखिळा झाला होता. थोडीबहुत आशा होती ती पक्षाच्या संघटनेकडून. कॉलेज जीवनापासून आक्रमक नेत्या अशी प्रतिमा असलेल्या, आक्रमण हाच बचावाचा मार्ग मानणाऱ्या ममतांनी लोकभावनेची नाडी, कार्यकर्त्यांची मानसिकता ओळखली. बड्यांना ललकारणारे नेहमीच समाजाचे हीरो बनतात, हे ओळखले. शेतजमिनीसाठी संघर्षामुळे ज्या नंदीग्रामने त्यांचे नेतृत्त्व फुलविले, तिथेच शुभेन्दू अधिकारी यांच्या रूपाने बंड झाले. त्या भागात प्रचंड प्रभाव असलेले अधिकारी घराणे विरोधात गेले. तेव्हा, भवानीपूर हा जुना परंपरागत मतदारसंघ सोडून नंदीग्राममधून लढण्याचा निर्णय घेतला. अन्य कुणी नेता दोन जागांवर लढला असता. ममता बॅनर्जी यांनी हे टाळले. हा विजयाचा पहिला टप्पा होता.
जखमी पाय, बर्म्युडा, दीदी ओ दीदी, अशा असभ्य भाषेत भाजपकडून होणारा प्रचार ममता बॅनर्जी यांच्या पत्थ्यावर पडला. महिलांमध्ये सहानुभूती निर्माण झाली. भाजपने ममता बॅनर्जी व तृणमूलवर हल्ले वाढविताच बंगाली अस्मिता आकार घेऊ लागली. लोकांशी चर्चा करताना ती सूक्ष्म लाट जाणवत होती. ढोकळा-फाफडा नको, आपला रसगुल्लाच बरा, अशी त्या अंडरकरंटची भाषा होती.
धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर दिल्ली टक्कर या निमित्ताने गायपट्ट्याच्या बाहेर हिंदुत्त्वाच्या मुद्याचाही कस लागला. जय श्रीरामच्या घोषणेसह धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न भाजपकडून झाला. तेव्हा आपल्या मुख्यमंत्री धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावर भाजपचे आव्हान स्वीकारताहेत हे पाहताच एरव्ही डावे पक्ष किंवा काँग्रेसचा परंपरागत म्हणविला जाणारा मतदार पूर्ण ताकदीने ममता बॅनर्जींच्या पाठीशी उभा राहिला. त्यात अल्पसंख्यांक मुस्लीम मतदारांसोबत सहिष्णू हिंदू मतदारही मोठ्या प्रमाणावर होते हे निकालाने स्पष्ट झाले.
तृणमूलमधून भाजपमध्ये इतके नेते आले की मूळ भाजपचा चेहराच हरवला. त्यामुळे जुने भाजप कार्यकर्ते अस्वस्थ झाले. त्यात पुन्हा ज्यांचे तृणमूलमध्ये एकमेकांशी पटत नव्हते ते भाजपमध्ये आल्यानंतर पुढे काय होणार, याचीही चर्चा होऊ लागली.
n ममता बॅनर्जींचा हा विजय २०१६ पेक्षा मोठा व सध्याच्या राजकीय स्थितीचा विचार करता ऐतिहासिक आहे. या निवडणुकीत आक्रमण कसे करावे याचा वस्तुपाठ भाजपने देशासमोर ठेवला तर भाजपशी, विशेषत: मोदी-शहा यांच्याशी कसे त्यांच्याच शैलीत लढावे, कसे त्यांच्याच भाषेत त्यांना उत्तर द्यावे, हे ममता बॅनर्जी यांनी दाखवून दिले.
n तुम्ही सुसंस्कृत राजकारण व सभ्यता सोडणार असाल तर आम्हीही तसेच करू. तुम्ही साम, दाम, दंड भेद वापरणार असाल तर आमचे हात बांधलेले राहणार नाहीत, हा या राजकीय संघर्षातील स्पष्ट संदेश आहे.
शेतजमिनीसाठी संघर्षामुळे ज्या नंदीग्रामने त्यांचे नेतृत्त्व फुलविले, तिथेच शुभेन्दू अधिकारी यांच्या रूपाने बंड झाले. त्या भागात प्रचंड प्रभाव असलेले अधिकारी घराणे विरोधात गेले. तेव्हा, भवानीपूर हा जुना परंपरागत मतदारसंघ सोडून नंदीग्राममधून लढण्याचा निर्णय घेतला. हाच त्यांचा पहिला पिजय.
बंगालला ढोकळा-फाफडा नको, आपला रसगुल्ला प्यारा