मुंबई : रिलायन्स जिओने दोन वर्षांत भारतीय ग्राहकांना इंटरनेट आणि कॉलिंग खूपच स्वस्त केल्याने इतर कंपन्यांचे कंबरडे मोडले आहे. याआधी खोऱ्याने पैसे ओढणाऱ्या कंपन्या मेटाकुटीला आल्या असून इनकमिंग कॉलसाठी पैसे आकारण्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही.
रिलायन्सने 400 रुपयांत जवळपास तीन महिने मोफत इंटरनेट आणि कॉलिंग सेवा पुरविल्याने दोन वर्षांपूर्वी आयडीया, व्होडाफोन, एअरटेल सारख्या मतब्बर कंपन्यांनाही ग्राहक टिकविण्यासाठी या स्पर्धेत उतरावे लागले. जिओला टक्कर देण्यासाठी या कंपन्यांनी जिओसारखेच टेरिफ प्लॅन जाहीर केले आणि कंपन्यांचा फायदा कमी होऊ लागला. व्होडाफोन आयडीयाला नुकताच 5 हजार कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे.
यामुळे या कंपन्यांनी ग्राहकांना मोफत इनकमिंगची सुविधा न देण्याचा निर्णय घेतला आहे. इनकमिंगसाठी ग्राहकांना कमीतकमी 35 रुपयांचे रिचार्ज करावे लागणार आहे. याद्वारे कंपन्या उत्पन्न वाढविणार आहेत. ग्राहकांनी रिचार्ज न केल्यास त्यांची सेवा बंद करण्यात येणार आहे.
यामुळे सर्व टेलिकॉम कंपन्यांनी 35 रुपयांचे रिचार्ज सक्तीचे केले आहे. हे रिचार्ज केल्यास 26 रुपयांचा टॉकटाईम आणि 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार आहे. 28 दिवसांनंतर पुरेसा बॅलंस जरी असला तरीही ग्राहकाची आऊटगोईंग सुविधा बंद करण्यात येणार आहे. यानंतर काही काळाने इनकमिंग सेवा बंद करण्यात येणार आहे.