नवी दिल्ली : जगभरामध्ये उत्सुकतेचा विषय असलेल्या ५ जी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये रिलायन्सच्याजिओने उडी घेतली असून, पहिली भारतीय कंपनी बनण्याचा बहुमानही पटकावला आहे. निवडक महानगरांमध्ये आपल्या ५ जी नेटवर्कची चाचणी करण्यासाठी स्पेक्ट्रमची मागणी रिलायन्सजिओने नोंदविली आहे. दूरसंचार विभागाकडे हा अर्ज करण्यात आला असून, दोन्ही बॅण्डवर आपल्याला स्पेक्ट्रम मिळावेत, अशी विनंतीही कंपनीने दूरसंचार विभागाला केली आहे.
चीनबरोबर संघर्षात्मक स्थिती निर्माण झाल्यावर चीनच्या ह्युवेई कंपनीला ५ जीचे कंत्राट नाकारण्यात आल्याने भारतामध्ये ही सेवा सुरू होणार कधी, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्याला जिओने तत्काळ उत्तर दिल्याने नागरिक या सेवेसाठी आतूर झाले आहेत.
जिओने दूरसंचार विभागाकडे केलेल्या अर्जामध्ये आपल्याला एमएम वेव्हच्या दोन्ही बॅण्ड्सवर प्रत्येकी ८०० मेगाहर्ट्झचे स्पेक्ट्रम देण्याची मागणी केली आहे. या माध्यमातून कंपनी आपणच विकसित केलेल्या संपूर्ण देशी बनावटीच्या ५ जी तंत्रज्ञानाची चाचणी घेणार आहे. जगात निवडक देशांतच ५ जी तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यात भारत समाविष्ट होणार असल्याने ही आनंदाची बाब आहे.
रिलायन्सच्या वार्षिक सभेमध्ये केली होती घोषणा
च्रिलायन्स इंडस्ट्रिजच्या बुधवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी जिओने स्वत:चे५ जी तंत्रज्ञान विकसित केल्याची घोषणा केली होती.
च्संपूर्ण स्वदेशी असलेल्या या तंत्रज्ञानामध्ये आपले ४ जी नेटवर्क हे सहजपणे ५ जीमध्ये बदलणे शक्य होणार असल्याचे रिलायन्सचे म्हणणे आहे. यामुळे जिओ स्वत: ५ जी तंत्रज्ञान विकसित केलेल्या कंपन्यांमध्ये समाविष्ट होणार आहे. पुढील वर्षी भारतात ५ जी सेवेला प्रारंभ होण्याची शक्यता आहे.