चंदिगढ : ‘जैश-ए-मोहम्मद’ या बंदी घातलेल्या संघटनेचे सहा-सात अतिरेकी पंजाबमध्ये घुसले असून ते पुढे दिल्लीला जाण्याची शक्यता आहे, अशी खबर राज्य पोलिसांच्या गुप्तहेर शाखेने दिल्यानंतर सीमेवरील संपूर्ण पंजाब राज्यात ठिकठिकाणी नाकाबंदी आणि कसून वाहनतपासणी सुरु करण्यात आली आहे.
गुप्तहेर शाखेच्या पोलीस महानिरीक्षकांनी सर्व पोलीस ठाण्यांना ही माहिती कळविली. या अतिरेक्यांचे मनसुबे नाकाम करण्यासाठी योजायच्या तातडीच्या उपायांच्या सूचना केल्या. पत्रात हे अतिरेकी राज्याच्या फिरोजपूर भागात शिरले असल्याची शक्यता कळविली गेली.सीमेवरील पठाणकोट जिल्ह्याच्या माधोपूर भागात चालकाला बंदुकीचा धाक दाखवून बुधवारी सकाळी एक इनोव्हा टॅक्सी पळविण्याच्या घटनेच्या पाठोपाठ गुप्तहेर खात्याने अतिरेक्यांच्या या संभाव्य घुसखोरीचा ‘अॅलर्ट’ दिला आहे. तीन वर्षांपूर्वी पठाणकोट येथील पोलीस ठाण्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा ‘अॅलर्ट’ अधिक गांभीर्याने घेतला जात आाहे. जवान असल्याची बतावणीजम्मूतील टॅक्सी युनियनचे उपाध्यक्ष राजिंदर सिंह यांनी सांगितले की, जम्मूमध्ये मेजर सर्वजित सिंह यांच्या नावे टॅक्सी बुक करण्यात आली होती. टॅक्सी स्टँडवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते चार लोक दिसत असून एकाने माकडटोपी घातली होती.आपण लष्करातले जवान आहोत असे या चौघांनी लखनपूर येथील टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांना सांगितले व टोल भरला नाही.