एस. पी. सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा: बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री संतोष सुमन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जितनराम मांझी यांचे ते पुत्र आहेत. अनुसूचित जाती-जमाती कल्याण विभागाचे ते मंत्री होते. त्या राज्याचे अर्थमंत्री विजय चौधरी यांची भेट घेऊन संतोष सुमन यांनी आपला राजीनामा त्यांच्याकडे सुपुर्द केला. त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे.
त्यानंतर एका पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, हिंदुस्थानी अवाम मोर्चा या आमच्या पक्षाचे जनता दल (यू)मध्ये विलीनीकरण करावे असा प्रस्ताव आम्हाला नितीशकुमार सरकारकडून देण्यात आला होता. मात्र, आमच्या पक्षातील नेते, कार्यकर्त्यांना ते मान्य नव्हते. विलीनीकरणासाठी जनता दल (यू)कडून आमच्यावर दबाव वाढत होता. त्यापुढे न झुकता मी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
संतोष सुमन यांनी सांगितले की, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे हिंदुस्थानी अवाम मोर्चा या आमच्या पक्षाचे अस्तित्व संपवू पाहत आहेत. मात्र, आम्ही तसे होऊ देणार नाही. मी मंत्रिपदाचा दिलेला राजीनामा स्वीकारण्यात यावा अशी विनंती नितीशकुमार यांना करण्यात आली आहे. आमच्या पक्षाला महागठबंधनमध्ये ठेवायचे की नाही याचा निर्णय लालूप्रसाद यादव, नितीशकुमार घेतील. काही तत्त्वांच्या आधारे हिंदुस्थानी अवाम मोर्चा या पक्षाची स्थापना झाली आहे. तो पक्ष जनता दल (यू)मध्ये विलीन करण्याऐवजी मी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
आगामी लोकसभा निवडणूक न लढविण्याचे जितन राम मांझी यांनी सोमवारी जाहीर केले होते. २३ जून रोजी पाटणा येथे होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीला जाणार नसल्याचेही मांझी यांनी जाहीर केले होते.
‘एनडीएमध्ये जाण्याबाबत अद्याप निर्णय नाही
संतोष सुमन यांनी सांगितले की, महागठबंधनची साथ सोडली असली तरी एनडीएमध्ये जाण्याबाबत आम्ही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. बिहारमध्ये आम्ही स्वबळावर निवडणुका लढवू शकतो. हिंदुस्थानी अवामी आमच्या पक्षातील नेते, कार्यकर्ते यांच्यासोबत चर्चा करून पुढच्या वाटचालीबाबत निर्णय घेतला जाईल.