पणजी : एक मे रोजीच्या कामगारदिनासह शनिवार, रविवार अशी तीन दिवस सलग सुट्टी आल्याने विविध प्रांतांमधील पर्यटकांनी गोवा गाठले आहे. त्यामुळे येथील समुद्रकिनारे गर्दीने फुलून गेले आहेत. मात्र, वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण पडल्याने शुक्रवारी दिवसभर विविध ठिकाणी वाहतूक कोंडी झाली.सकाळपासूनच महाराष्ट्र हद्दीवरील धारगळ, दोडामार्ग व कर्नाटक हद्दीवरील पोळे, केरी टोलनाक्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. म्हापसा, पणजी, मडगाव आदी प्रमुख बाजारपेठांमध्ये पर्यटकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती. अनेक ठिकाणी वाहने रस्त्याच्या दुतर्फा पार्क केल्याने वाहतूक कोंडी झाली होती. दुपारपर्यंत समुद्रावर पर्यटकांनी गर्दी केली होती. सायंकाळी त्यांनी जलसफरीचा आनंदही लुटला. मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाल्याने हॉटेल बुकिंग, वाहतूक व्यवस्था, पार्किंग आदी व्यवस्थांचा गोंधळ उडाला. सुटीचे अजून दोन दिवस बाकी असल्याने वाहतूक पोलिसांचीही डोकेदुखी वाढविण्याची चिन्हे आहेत.
किनारे गजबजले : सलग सुटीमुळे ‘जिवाचा गोवा’
By admin | Published: May 02, 2015 1:18 AM