सिरसा : हरयाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा यांच्यावर हल्लाबोल केला आहे. दुष्यंत चौटाला हे जननायक जनता पार्टीचे (जेजेपी) अध्यक्ष आहेत. हरयाणामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी दुष्यंत चौटाला यांनी आपल्या पार्टीचा पाठिंबा भाजपाला दिल्यामुळे भूपिंदर सिंह हुड्डा यांनी त्यांचावर निशाणा साधला होता. मात्र, याला प्रत्युत्तर देताना दुष्यंत चौटाला यांनी भूपिंदर सिंह हुड्डा मुख्यमंत्री असताना सीएलयू (चेंज ऑफ लँड यूज) च्या नावावर घोटाळा करून राज्याला लुटले, अशा शब्दात पलटवार केला आहे.
दुष्यंत चौटाला यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी दुष्यंत चौटाला म्हणाले, "निवडणुकीत आम्ही भाजपाच्या बाजूने किंवा काँग्रेसच्या बाजूने मते मागितली नाहीत. आम्ही भाजपासोबत किंवा काँग्रेससोबत निवडणूक लढलो नाही. 18 लाख 60 हजार मतांनी जनतेने जननायक जनता पार्टीचे 10 आमदार निवडून दिले आहेत. आम्हाला जनतेचे हित पाहून निर्णय घ्याला लागेल. हरयाणामधील स्थीर सरकारसाठी आपल्याला पाऊल टाकणे गरजेचे होते. त्यामुळे आम्ही योग्य निर्णय घेतला."
याचबरोबर, ज्यावेळी भूपिंदर सिंह हुड्डा सरकारमध्ये होते. त्यावेळी सीएलयू (चेंज ऑफ लँड यूज) च्या नावावर घोटाळा केले आणि राज्याला लुटले, अशा शब्दांत भूपिंदर सिंह हुड्डा यांच्यावर दुष्यंत चौटाला यांनी टीका केली.
हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाले. त्यामुळे भाजपाने जेजेपीचा पाठिंबा घेत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी काल शपथविधी सोहळा पार पडला. या शपविधी सोहळ्याला भूपिंदर सिंह हुड्डा सुद्धा उपस्थित होते. यावेळी भूपिंदर सिंह हुड्डा यांनी भाजपाला जेजेपीने दिलेला पाठिंबा म्हणजे मतदारांनी दिलेल्या कौलाचा अपमान असल्याचे सांगत जेजेपीबाबत नाराजी व्यक्त केली.
भूपिंदर सिंह हुड्डा म्हणाले होते की, "ही युती म्हणजे मतदान कोणाचे तरी आणि पाठिंबा कोणाला तरी या आधारावर बनली आहे. हे सरकार स्वार्थावर आधारित आहे. जेजेपीने जनतेच्या कौलाचा अपमान केला आहे. आमच्या पार्टीत झालेल्या बदलांमुळे आमच्याकडे कमी कालावधी होता. जर हे बदल आधीच झाले असते तर याचा परिणाम यापेक्षा वेगळा असता."
दरम्यान, मनोहरलाल खट्टर यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर दुष्यंत चौटाला यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांनी खट्टर यांना सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर काल राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला आहे. शपथविधी सोहळ्याला अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. मनोहरलाल खट्टर हे सलग दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत.