श्रीनगर - पाकिस्तानच्या सीमारेषेवरील कुरापती दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. भारतीय लष्करदेखील पाकिस्तानच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत आहे. दरम्यान, बुधवारी सकाळीदेखील पाकिस्ताननं जम्मू काश्मीरच्या बालाघाट सेक्टर आणि राजौरी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केले. पाकिस्तानकडून अंदाधुंद गोळीबार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय सैनिकदेखील पाकिस्तानच्या या हल्ल्याला जशासतसे प्रत्युत्तर देत आहेत.
निवासी भागांना केलं टार्गेटमिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्ताकडून स्वयंचलित शस्त्रास्त्रांद्वारे हल्ला केला. शिवाय, निवासी भागांवर उखळी तोफांचा माराही करण्यात आला. यापूर्वी पाकिस्ताननं 11 आणि 8 ऑक्टोबरलाही पूंछ जिल्ह्यातील करमारा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केले होते. वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन दरम्यान, यापूर्वी 3 ऑक्टोबरला जम्मू काश्मीरच्या भीमबेर गल्ली सेक्टरमध्येही पाकिस्ताननं गोळीबार केला होता. ज्यात भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला होता. 2 ऑक्टोबरला पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत निवासी भागांना टार्गेट केले होतं. यामध्ये तीन नागरिकांचा मृत्यू झाला होता तर पाच जण जखमी झाले होते. दरम्यान, गृहमंत्रालयाच्या अहवालानुसार 2017 मध्ये सप्टेंबर महिन्यापर्यंत पाकिस्तानकडून 600 हून अधिक वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केले आहे. यामध्ये 16 जवान आणि आठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 2016मध्ये 450 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले आहे.