जम्मू-काश्मीर- गेल्या काही दिवसांपासून कथुआ बलात्काराच्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपींच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत सहभाग घेतल्यामुळे भाजपाच्या दोन मंत्र्यांना यापूर्वीच राजीनामा द्यावा लागला होता. आता जम्मू-काश्मीरच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच कविंद्र गुप्ता यांनी कथुआची घटना छोटी असल्याचं सांगत नव्या वादाला फोडणी दिली आहे. ते म्हणाले, कथुआ प्रकरण न्याय प्रक्रियेत असल्यानं त्यावर सर्वोच्च न्यायालय योग्य तो निर्णय देईल. सारखा सारखा एकच विषय काढणं योग्य नाही. जाणूनबुजून हे प्रकरण पुढे आणलं जातंय, अशा लहान प्रकरणांना जास्त महत्त्व देण्याची गरज नाही. जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री कविंद्र यांच्या या वादग्रस्त विधानानं विरोधकांना भाजपाला घेरण्याची आयतीच संधी मिळणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपानं जम्मू-काश्मीर विधानसभा अध्यक्ष कविंद्र गुप्ता यांना मंत्री बनवलं आहे. वयाच्या 13व्या वर्षापासूनच कविंदर गुप्ता हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय आहेत. ते सलग तीन वेळा (2005 ते 2010) जम्मूचे महापौर होते. 2014मध्ये ते पहिल्यांदाच गांधीनगर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. एकमताने त्यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. मला पक्षाने जबाबदारी दिली आहे. समर्पित भावनेने मी जनतेची सेवा करीन. तसेच जनतेच्या मागण्या आणि आशा-आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन, अशी खात्री उपमुख्यमंत्री गुप्ता यांनी दिली.
कथुआ बलात्कार ही छोटी घटना, जम्मू-काश्मीरच्या उपमुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 9:41 PM