मुंबई : ३७0 कलम रद्द झाल्यास जम्मू-काश्मिरात पुन्हा एकदा गुंतवणूक येऊ शकते, पण त्यासाठी तिथे शांतता निर्माण होणे आवश्यक आहे, असे मत औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले आहे.८0च्या दशकात जम्मू-काश्मिरात उद्योग उभे राहत होते. दहशतवाद पसरल्यानंतर ते नष्ट झाले. आरपीजी समूहाचे संस्थापक रमाप्रसाद गोयंका यांनी ८0च्या दशकात श्रीनगरमध्ये दोन इलेक्ट्रॉनिक्स प्रकल्प सुरू केले होते. दोन वर्षांनी कंपनीच्या मॅनेजरची अतिरेक्यांनी हत्या केल्याने प्रकल्प बंद करावे लागले. आर. पी. गोयंका यांचे पुत्र हर्ष गोयंका म्हणाले की, ३७0 रद्द झाल्यानंतर गुंतवणुकीला चालना मिळू शकते, पण त्यासाठी राजकीय स्थैर्य व शांतता आवश्यक आहे.एमओएफएसएलचे एमडी मोतीलाल ओसवाल म्हणाले की, ३७0 रद्द झाने जम्मू-काश्मिरात कायमस्वरूपी उद्योग उभे राहण्यास मदत होईल. बायोकॉनच्या चेअरमन तथा एमडी किरण मुझुमदार-शॉ म्हणाल्या की, हे कलम काश्मीरला आर्थिक भरभराटीत सहभागी होण्याचे नाकारत होते. गुंतवणूक शून्य होती. उच्च प्रतीचे रोजगारही नव्हते. आता परिस्थिती बदलेल. गुंतवणूक येण्यास मात्र थोडी वाट पाहावी लागेल.
जम्मू-काश्मिरात पुन्हा येऊ शकते गुंतवणूक; औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 4:01 AM