'राहुल बाबा, तुमच्या तीन पिढ्यांमध्ये कलम 370 परत आणण्याची ताकद नाही', शाहांचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 03:27 PM2024-09-26T15:27:30+5:302024-09-26T15:28:12+5:30

'काँग्रेस आणि एनसीला जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद आणायचा आहे. हे लोक आपल्या देशाच्या संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरूच्या फाशीच्या शिक्षेचा निषेध करतात. '

J&K Poll 2024: 'Rahul Gandhi, your three generations have no power to bring back Article 370', Amit Shah attacks | 'राहुल बाबा, तुमच्या तीन पिढ्यांमध्ये कलम 370 परत आणण्याची ताकद नाही', शाहांचा हल्ला

'राहुल बाबा, तुमच्या तीन पिढ्यांमध्ये कलम 370 परत आणण्याची ताकद नाही', शाहांचा हल्ला

Amit Shah Attack Rahul Gandhi : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे. भाजप आणि काँग्रेसचे दिग्गज नेते सक्रीयपणे राज्यातील विविध मतदारसंघात प्रचारसभा घेत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी (26 सप्टेंबर 2024) उधमपूर येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला. "राहुल बाबा म्हणतात आम्ही 370 परत आणू. पण, तुमच्या पुढील तीन पिढ्यांमध्ये 370 परत आणण्याची ताकद नाही," असा घणाघात अमित शाहंनी केला.

जम्मू-काश्मीरला भाजप पूर्ण राज्याचा दर्जा देणार
ते पुढे म्हणतात, "मोदी सरकारमध्ये दगडफेक किंवा दहशतवादाच्या घटना घडत नाही. राहुलबाबा काल म्हणाले की, आम्ही राज्याचा पूर्ण दर्जा देऊ. जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा नक्कीच मिळेल, पण तो नरेंद्र मोदी देतील. ओमर अब्दुल्ला आणि राहुल बाबा म्हणतात की, आम्ही काश्मीरमध्ये लोकशाही आणू. पण, याच कुटुंबांनी जम्मू-काश्मीरला 70 वर्षे याच दोन कुटुंबांनी विभागून ठेवले. यापूर्वी राज्यात शांततेत निवडणुका व्हायच्या का? नरेंद्र मोदींमुळे आज राज्यात शांततेत निवडणुका होत आहेत."

दहशतवादाला फाशीनेच उत्तर मिळणार
शाह पुढे म्हणतात, "काँग्रेस आणि एनसीला जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद आणायचा आहे. हे लोक आपल्या देशाच्या संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरूच्या फाशीच्या शिक्षेचा निषेध करतात. ओमर अब्दुल्ला दहशतवाद्यांना बिर्याणी खाऊ घालायचे. अफल गुरुला फाशी देणे गरजेचे होते. जो कोणी दहशत पसरवेल त्याला फाशीनेच उत्तर दिले जाईल. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद परत आणण्याची ताकद कोणामध्ये नाही."

फारुख अब्दुल्ला त्यावेळी कुठे होते?
"जम्मू आणि काश्मीरमधील 40,000 लोकांच्या हत्येसाठी अब्दुल्ला आणि नेहरू जबाबदार आहे. ते उन्हाळ्यात लंडनमध्ये सुट्टी घालवत होते, महागड्या मोटारसायकल चालवत होते. कोणत्याही पक्षाने नाही तर केवळ भाजपनेच जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाचा नायनाट केला आहे. आत्ताच राहुल बाबा इथे आले होते, ते म्हणाले की इथे बाहेरचे लोक राज्य करतात. त्यांचा निशाणा उप-राज्यपालांवर होता. पण, जम्मू-काश्मीरमध्ये सर्वाधिक राष्ट्रपती राजवट त्यांची आजी आणि वडील राजीव गांधी यांच्या काळात लावण्यात आली होती", अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

आता इथे कोणताही धोका नाही
शाह पुढे म्हणतात, "यापूर्वी कधीच लाल चौकात ताजिया मिरवणूक, गणपती मिरवणूक आणि कृष्ण जन्माष्टमी साजरी झाली नाही. आज लाल चौकातही गणेश चतुर्थी साजरी करण्यात आली. हा दृष्टिकोनाचा फरक आहे. घाटीत 33 वर्षांनंतर चित्रपटगृहे सुरू झाली. फारुख साहेब, तुमच्यामुळे 33 वर्षे सिनेमा हॉल बंद होते. जग जम्मू आणि काश्मीरच्या निवडणुकांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. एकीकडे एनसी, काँग्रेस आणि पीडीपी हे पक्ष जवळपास 40 वर्षांपासून या प्रदेशात दहशतवाद कायम ठेवत आहेत. दुसरीकडे, दहशतवादाचा समूळ नायनाट करण्यासाठी कटिबद्ध असलेला भाजप आहे."

'जम्मूमध्ये बनणार आंतरराष्ट्रीय विमानतळ'
"माझे हेलिकॉप्टर येथे उतरणार होते, पण उतरू शकले नाही. मी उधमपूरला उतरलो. मी ड्रायव्हरला म्हणालो की, इथे पोहोचायला 1 तास लागेल, तर ड्रायव्हर म्हणाला रस्ता चांगला असल्याने फक्त 25 मिनिटे लागतील. हा रस्ता बनवण्याचे काम आमच्या सरकारने केले. राज्यात भाजपचे सरकार आल्यावर आम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा वार्षिक हप्ता 6 हजारांवरून 10 हजारांपर्यंत वाढवणार आहोत. याशिवाय, जम्मूमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधणार, मेट्रो आणणार आहोत. दहशतवाद्यांनी उद्ध्वस्त केलेल्या 100 मंदिरांचा जीर्णोद्धारदेखील आम्ही करणार आहोत," अशी आश्वासने शाहंनी यावेळी दिली.

Web Title: J&K Poll 2024: 'Rahul Gandhi, your three generations have no power to bring back Article 370', Amit Shah attacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.