Jammu-Kashmir Encounter :जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील जंगल परिसरात रविवारी(दि.10) दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. यात लष्कराचे तीन जवान जखमी झाले, तर एक कनिष्ठ अधिकारी शहीद झाला. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या 15 तासांत चकमकीच्या तीन घटना समोर आल्या आहेत. सोपोरमध्ये सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहिली चकमक श्रीनगरच्या बाहेरील जबरवान जंगल परिसरात झाली. येथे दोन ते तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेराव घातला असून, त्यांचा शोध सुरू आहे. अनेक तासांपासून या परिसरात शोध मोहिम सुरू आहे.
दुसरी चकमक किश्तवाडमध्ये झाली. येथील जंगलात दहशतवादी लपून बसले होते. दहशतवाद्यांचा गोळीबारात नायब सुभेदार राकेश कुमार शहीद झाले, तर चार सैनिक जखमी झाले आहेत. या घटनेत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. तर, तिसरी चकमक सोपरमध्ये झाली, या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला आहे.