जम्मू-काश्मीर : 2012 साली जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन(JKCA)मध्ये झालेल्या 113 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांचे सुद्धा नाव आहे. सीबीआयने सोमवारी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर आरोपपत्र दाखल केले. दरम्यान, याआधी सर्व आरोपी उपस्थित नसल्यामुळे कोर्टाने आरोपपत्र स्वीकारण्यास नकार दिला होता. मात्र, आज आरोपपत्र दाखल केल्यानंतर कोर्टात सर्व आरोपी हजर होते. मात्र, फारुख अब्दुल्ला यावेळी उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांची गैरहजेरीकडे गंभीर स्वरुपात पाहिले जाणार आहे. याप्रकरणी कोर्ट त्यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्याची शक्यता आहे. दरम्यान, 2012 मध्ये जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनमध्ये जवळपास 113 कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. बीसीसीआयने एप्रिल 2002 ते डिसेंबर 2011 च्या दरम्यान जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनला फंड ट्रान्सफर केला, मात्र फंडाच्या रकमेत कथितरित्या घोटाळा करण्यात आला. पोलिसांच्या तपासात अभाव असल्यामुळे गेल्यावर्षी हायकोर्टाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला आहे. सीबीआयने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वेळ मागितला आहे.
JKCA Scam: फारुक अब्दुल्ला यांच्याविरोधात सीबीआयचे आरोपपत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 5:40 PM