Jammu and Kashmir Assembly Election Result 2024: जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये नॅशनल कॉन्फरन्सने मोठं यश मिळवलं आहे. तब्बल १० वर्षांनंतर जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सचा मोठा विजय झाला. नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला हे बडगाम मतदारसंघातून विजयी झाले आहेत. अशातच नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारूख अब्दुल्ला यांनी ओमर अब्दुल्ला जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा केली आहे.
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची आघाडी विजयाकडे वाटचाल करत आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी मु्ख्यमंत्री पदाबाबत घोषणा केली आहे. ओमर अब्दुल्ला यांनी बडगामधून विजय मिळवल्यानंतर ते मुख्यमंत्री होणार असल्याचे फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. ओमर अब्दुल्ला हे संपूर्ण कार्यकाळ मुख्यमंत्री असतील. पॉवर शेअरिंग हा मुद्दा नाही. आम्ही जम्मू-काश्मीरच्या लोकांचे आभारी आहोत, असे फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.
"१० वर्षांनंतर जनतेने आम्हाला जनादेश दिला आहे. आम्ही अल्लाहला प्रार्थना करतो की आम्ही त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू. इथे पोलिसांचे नाही तर लोकांचे राज्य असेल. तुरुंगात टाकलेल्या निरपराधांना बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आता इथे माध्यम स्वातंत्र्य असेल. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे. मला आशा आहे की इंडिया आघाडीचे भागीदार येथे राज्याचा दर्जा बहाल करण्यासाठी आमच्यासोबत उभे राहतील. ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री होणार आहेत. मला दुःख आहे की ते (काँग्रेस) (हरयाणामध्ये) जिंकले नाहीत. मला वाटते की त्यांच्या अंतर्गत वादामुळे हे घडले," असे फारूख अब्दुल्ला यांनी म्हटलं.