ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. २८ - प्रसिद्ध लेखिका आणि समाजसेविका महाश्वेता देवी यांचे गुरुवारी दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. साहित्य क्षेत्रातील ज्ञानपीठ या सर्वोच्च पुरस्कारने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. त्याशिवाय पद्मविभूषण, मॅगसेस पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
कोलकात्यातील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारताने एक महान लेखक आणि बंगालने आई गमावली आहे. मी माझा व्यक्तीगत मार्गदर्शक गमावला असून, महाश्वेता देवींच्या आत्म्याला शांती लाभो असे टि्वट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले.
महाश्वेतादेवी लेखिका त्याच्याबरोबर सामाजिक कार्यकर्त्या होत्या. भारताच्या वेगवेगळया समाजातील कमकुवत घटकांच्या कल्याणासाठी त्यांनी कार्य केले. मागच्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ढासळली होती.
महाश्वेता देवीच्या कथेवर आधारीत मराठी चित्रपट
महाश्वेतादेवी यांनी लिहिलेल्या कथेवर आधारित म्हादू हा मराठी चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सारंग साठ्ये, राजकुमार तांगडे, वीणा जामकर, कैलास वाघमारे, शशांक शेंडे, देविका दफ्तरदार अशी तगडी कास्ट होती. या चित्रपटाची कथा कोरकू या मागासलेल्या जमातीवर बेतलेली होती. मेळघाटात राहाणाऱ्या या आदिवासी जमातीत कुपोषण ही मोठी समस्या आहे. ही जमात संपूर्ण जगापासून काहीशी दूर राहाण्याचाच प्रयत्न करते. आधुनिक तंत्रज्ञानावर त्यांचा विश्वासच नाहीये. त्यामुळे आजारी पडल्यावर डॉक्टर, उपचार अशा काही गोष्टी असतात हे त्यांना पटतच नाही. याच त्यांच्या जीवनशैलीवर आणि त्यांच्या आयुष्यात बदल घडवण्याची इच्छा असणाऱ्या एका डॉक्टरची कथा या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. कुपोषण या गंभीर समस्येवर या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक संदेश भंडारे यांनी प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला होता.
या चित्रपटाची कथा ही महाश्वेतादेवी यांची असल्याने हा चित्रपट बनवण्यापूर्वी संदेश भंडारे महाश्वेतादेवी यांना भेटायला गेले होते. त्यावेळी त्यांना आलेला अनुभव शब्दांत मांडणे खूपच कठीण असल्याचे त्यांनी सांगितले होते. संदेश यांनी भेटल्यानंतर महाश्वेतादेवी यांना रॉयल्टीच्या रक्कमेबाबत विचारले होते. त्यावर त्यांनी त्यांच्या कथेवर चित्रपट बनवण्यासाठी केवळ एक रुपयाची मागणी केली होती. त्यांनी मागितलेली ही रक्कम ऐकून मला धक्काच बसला होता असे संदेश यांनी सांगितले होते. तरीही इतक्या मोठ्या व्यक्तीला इतकीशी छोटी रक्कम कशी द्यायची असा विचार करून संदेश यांनी या चित्रपटासाठी 21000 रुपये इतके मानधन त्यांनी दिले होते. अमोल धोंडगे या अभिनेत्याने या चित्रपटात म्हादू ही प्रमुख भूमिका साकारली होती.