नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील हिंसाचारग्रस्तांना विद्यापीठात आश्रय देऊ नका, असे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी संघाला बजावले आहे. हिंसाचारग्रस्तांना विद्यापीठात आश्रय दिल्याचे आढळून आल्यास संबंधित विद्यार्थ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा जेएनयूचे कुलसचिव प्रमोद कुमार यांनी दिला आहे. कुलसचिवांनी विद्यार्थ्यांना नोटीस पाठवली आहे. विद्यापीठ परिसरात कोणालाही आश्रय देण्याचा कायदेशीर अधिकार जेएनयू विद्यार्थी संघाला नसल्याचे कुलसचिवांनी या नोटीसमध्ये म्हटले आहे.जेएनयूसारख्या शैक्षणिक संस्थेचे संशोधन आणि अभ्यासाच्या क्षेत्रातील महत्त्व कायम राखले जावे आणि विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या नियमांचा भंग करू नये, अशी अपेक्षा कुलसचिवांनी व्यक्त केली आहे. जेएनयू विद्यार्थी संघाने हिंसाचारग्रस्तांना विद्यापीठात आश्रय देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हिंसाचारग्रस्तांना विद्यापीठात आश्रय दिल्याची तक्रार स्थानिकांनी विद्यापीठ प्रशासनाकडे केली होती.>हिंसाचारग्रस्तांना विद्यापीठ परिसरामध्ये आश्रय देणे अशक्य आहे. विद्यार्थी संघाने अशाप्रकारे निर्णय घेऊ नये. त्याऐवजी जीवनावश्यक वस्तू देऊन मानवतावादी दृष्टीकोनातून पीडितांना मदत करावी.- एम. जगदीश कुमार, कुलगुरू
हिंसाचारग्रस्तांना आश्रय दिल्यास कारवाई, जेएनयू प्रशासनाने विद्यार्थी संघाला बजावले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2020 5:51 AM