नवी दिल्ली - जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ सुरु असणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अभिनेत्री दिपिका पादुकोणने जेएनयू गाठले. त्यानंतर तिच्यावर सोशल मीडियातून #boycottchhapaak या माध्यमातून ट्रोलिंग करण्यात येत आहे. यावरुन भाजपाने आमचा याच्याशी काहीही संबंध नाही सांगत हात झटकले आहेत. दिपिकाला कुठेही जाण्याचा अधिकार आहे आम्ही तिच्या सिनेमाला बॉयकॉट करत नाही असा खुलासा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.
मंगळवारी रात्री उशिरा दिपिका पादुकोणने जेएनयू विद्यापीठ आंदोलनस्थळी भेट दिली त्यावेळी तिने विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आइशी घोष हिची भेट घेतली. या भेटीनंतर भाजपा नेते आणि समर्थकांनी दिपिकाचा आगामी चित्रपट छपाकवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन सोशल माध्यमातून केलं आहे. ट्विटरवर दिपिका पादुकोणच्या विरोधात बॉयकॉट छपाक ट्रेंड व्हायरल होत आहे. दिल्ली भाजपाचे प्रवक्ते तजिंदर सिंह पाल बग्गा यांनी दिपिकाला देशविरोधी कृत्याला समर्थन करणारी असून तिच्या सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. तर भाजपा खासदाराने दिपिकाला तुकडे गँगची समर्थक असल्याचं बोललं आहे.
भाजपा नेत्यांच्या या विधानावरुन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्टीकरण देत म्हटलंय की, स्वतंत्र्य भारतातील नागरिकाला कुठेही जाण्याचा अधिकार आहे. विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र कलाकारांनाच नाही तर भारतातील प्रत्येक व्यक्तीला आहे. आम्ही त्यांच्या सिनेमावर बहिष्कार टाकण्याचं समर्थन करत नाही कारण ते आमच्या संस्कृतीच्या विरोधात आहे असं त्यांनी सांगितले आहे.
दिल्ली पोलिसांनी जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आइशी घोषसह १९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सर्व्हर रुममध्ये तोडफोड केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रविवारी झालेल्या हिंसाचारात आइशी घोष जखमी झाली. तिच्या डोक्याला जखम झाली. त्यातून बराच रक्तस्रावदेखील झाला. घोषसोबतच साकेत मून, सतीश यादव, सारिका चौधरी आणि इतरांविरोधातही गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. भारतीय दंड विधानाच्या (आयपीसी) कलम ३४१, ३२३ आणि ५०६ च्या अंतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जेएनयूमध्ये रविवारी संध्याकाळी माक्सधारी व्यक्तींनी तोडफोड केली. हिंदू राष्ट्र दलानं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. दलाचे प्रमुख भूपेंद्र तोमर यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करत जेएनयूमध्ये देशविरोधी कारवाया सुरू असल्याचा गंभीर आरोप केला. देशविरोधी आणि हिंदूविरोधी कारवाया रोखण्यासाठी जेएनयूमध्ये तोडफोड केल्याचं म्हणत त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. मात्र अद्याप तोमर किंवा त्यांच्या संघटनेतील कोणाविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही.