नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये तोंडावर स्कार्फ बांधून आलेल्या टोळक्याने मोडतोड करून विद्यार्थी आणि शिक्षकांना मारहाण केल्याने देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर एका वृत्तवाहिनीने स्टिंग ऑपरेशन करून हा हल्ला एबीव्हीपीच्या सदस्यांनी केल्याचा दावा केला होता. तसेच या स्कार्फधारी हल्लेखोरांपैकी एक तरुणी ही दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थिनी आणि एबीव्हीपीची सदस्य कोमल शर्मा असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र आता कोमल शर्मा हिने ती तरुणी आपण नसल्याचा दावा केला आहे. तसेच आपल्यावर आरोप करून बदनाम केल्याप्रकरणी संबंधित वृत्तवाहिनीविरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, ''कोमल शर्मा हिने महिला आयोगाकडे या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. जेएनयूमध्ये 5 जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचारात आपले नाव चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. तसेच संबंधित वृत्तवाहिनीने प्रतिक्रिया किंवा स्पष्टीकरणासाठी आपल्याशी संपर्कही साधला नाही, असे तिने म्हटले आहे.''
ती मी नव्हेच! JNU मध्ये मारहाण करताना व्हिडीओत दिसत असलेल्या तरुणीचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 16:09 IST