नवी दिल्ली - दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीप्रकरणी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आज देशातील तरुण आणि विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जात आहे, त्यांची चेष्टा केली जात आहे. मोदी सरकारच्या संरक्षणाखाली देशातील तरुणांचा आवाज दाबून हिंसाचाराला उत्तेजन दिले जात आहे, असा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे.
रविवारी रात्री जेएनयूमध्ये घडलेल्या प्रकारावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सोनिया गांधी म्हणाल्या की, ''सध्या देशातील तरुण आणि विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जात आहे. त्यांची चेष्टा केली जात आहे. मोदी सरकारच्या संरक्षणाखाली देशातील तरुणांचा आवाज दाबून हिंसाचाराला उत्तेजन दिले जात आहे. काल जेएनयूमध्येविद्यार्थी आणि शिक्षकांवर झालेल्या हल्ल्याकडे सरकारकडून जनतेच्या असहमतीच्या आवाजाला दाबण्यासाठी आठवले जाईल.''
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये रविवारी सायंकाळी विद्यार्थ्यांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली होती. त्यावेळी दगडफेक आणि हिंसाचारात १८ जण जखमी झाले होते. जखमींमध्ये विद्यार्थी, संघटनांचे नेते आणि शिक्षकांचाही समावेश आहे. या हिंसाचारात विद्यापीठाच्या अनेक दालनांची मोडतोड झाली. जेएनयू स्टुडन्ट्स युनियन आणि संघ परिवारातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) यांनी या हिंसाचाराचे खापर परस्परांवर फोडले व त्यात आपले अनेक सदस्य जखमी झाल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते, मंत्री आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही झालेल्या प्रकारावर टीका केली आहे. राहुल गांधी, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सीपीएम नेते सीताराम येचुरी यांनीसुद्धा या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे.