नवी दिल्ली: देशद्रोहाच्या आरोपावरून अटक झाल्याने गेले तीन आठवडे संपूर्ण देशभर राजकीय वादंगाचा विषय ठरलेला जवाहरलाल नेहरु विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याची गुरुवारी सायंकाळी जामिनावर सुटका झाली. तिहार तुरुंगातून बाहेर पडल्यावर कन्हैयाला नेमके कुठे नेले गेले हे लगेच स्पष्ट झाले नव्हते परंतू काही वेळाने कन्हैया जेएनयूत परतला आणि कॅम्पसमधील विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी कन्हैया कुमारला सहा महिन्यांचा सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यानुसार त्याने दिलेला १० हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका दंडाधिकाऱ्यांनी स्वीकारला. याखेरीज जेएनयूमधील एक अध्यापक प्रा. एस. एन. मालाकार कन्हैया कुमारसाठी जामीन राहिले.जामिनाच्या औपचारिकता पूर्ण झाल्यावर सा. ६.३० च्या सुमारास कन्हैया कुमारला घेऊन पोलिसांच्या तीन एस्कॉर्ट मोटारींसह तिहार तुरुंगातून बाहेर काढले गेले. कारागृहाच्या प्रवेशव्दारावर गर्दी केलेल्या जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी त्याच्या सुटकेचे जोरदार स्वागतकेले.याआधी पतियाळा हाऊस न्यायालयाच्या आवारात कन्हैया कुमारला वकिलांनी मारहाण केली होती, ही वस्तुस्थिती आणि पुन्हा असे काही घडू नये याची खबरदारी म्हणून कन्हैया कुमारची सुटका कडक बंदोबस्तात आणि गोपनीय पद्धतीने करण्यात आली. कन्हैया कुमारची अपेक्षित सुटका लक्षात घेऊन जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी आणि प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी तिहारच्या प्रवेशद्वारावर मोठी गर्दी केली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)
कन्हैयाच्या सुटकेने जेएनयूमध्ये जल्लोष
By admin | Published: March 04, 2016 2:32 AM