नवी दिल्ली: दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) विद्यार्थ्यांसोबत मारहाणीची घटना समोर आली आहे. शिष्यवृत्ती मागण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातील कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेत जेएनयूमधील अभाविप अध्यक्ष रोहित कुमारसह 6 विद्यार्थी जखमी झाले आहेत. टीव्ही9 हिंदीने या घटनेचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 2 वर्षांपासून स्कॉलरशिप मिळाली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. शिष्यवृत्ती मागण्याची ते जेएनयू प्रशासनाकडे गेले, परंतु तिथे कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. यात अर्धा डझन विद्यार्थी जखमी झाले. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये जेएनयूमधील अभाविप अध्यक्ष रोहित कुमारचा समावेश आहे. लवकरच दिल्ली पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे जखमी विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये विद्यार्थी आणि रक्षकांमध्ये हाणामारी पाहायला मिळत आहे. हाणामारीत काही विद्यार्थी टेबलावर पडले, तर काहींना सुरक्षा रक्षकांनी मारहाण करून बाहेर काढले. दरम्यान, जेएनयू प्रशासनाच्या नकारात्मक वृत्तीविरोधात विद्यार्थी 12 ऑगस्टपासून अनिश्चित काळासाठी सत्याग्रह आंदोलन करत आहेत. 18 ऑगस्ट रोजीही विद्यार्थ्यांनी रेक्टर एके दुबे यांचा घेराव करुन घोषणाबाजी केली होती.