नवी दिल्ली: जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची अभिनेत्री दीपिका पादुकोणनं काल संध्याकाळी भेट घेतली. आपण आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसोबत असल्याचं यावेळी दीपिकानं म्हटलं. मात्र दीपिकानं माध्यमांशी बोलणं टाळलं. पावणे आठ वाजता जेएनयूच्या परिसरात पोहोचलेली दीपिका जवळपास १० मिनिटं आंदोलनस्थळी उपस्थित होती. यावेळी जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार 'जय भीम'च्या घोषणा देत होते. दीपिका पादुकोणनं जेएनयूमधील आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेताच भाजपाकडून तिच्यावर टीका सुरू झाली. दीपिकानं तुकडे-तुकडे आणि अफझल गँगचं समर्थन केलं आहे. त्यामुळे तिच्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्यात यावा, असं आवाहन भाजपाचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंह बग्ग यांनी केलं आहे. तर अभिनेत्री स्वरा भास्करनं दीपिकाचं कौतुक केलं. दीपिकानं जेएनयूच्या आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतल्याबद्दल सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. #boycottchhapaak आणि #ISupportDeepika असे दोन हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत आहेत.
भाजपा नेता म्हणतो, दीपिका तुकडे-तुकडे गँगची समर्थक; तिच्या चित्रपटांवर बहिष्कार घाला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 8:53 AM