ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 22 - सरकार जेएनयू, रोहित वेमुला प्रकरणावर चर्चेसाठी तयार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री वैंकय्या नायडू यांनी सांगितल आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर ते बोलत होते. या बैठकीला अर्थमंत्री अरुण जेटली, केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी, काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि ज्योतीरादित्य सिंधिया हजर होते.
जेएनयू आणि रोहित वेमुला प्रकरणांवर चर्चा करण्यावर सरकारचा कोणताच आक्षेप नाही आहे. प्रत्येकाला आपला मुद्दा उचलण्याचा हक्क आहे मात्र त्यावर चर्चा झाली पाहिजे. सरकार या चर्चेसाठी तयार आहे मात्र गोंधळ घालून संसदेच्या कामकाजात कोणी अडथळा आणू नये. विरोधी पक्षांनीदेखील येणा-या अधिवेशनासंबंधी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा असं आवाहन वैंकय्या नायडू यांनी केलं आहे.
जाट आरक्षणावरुन सुरु असलेलं आंदोलन शांत झाल्यानंतर समिती नेमकी या आंदोलनामागची कारण काय आहेत याचा आढावा घेईल असं वैंकय्या नायडू यांनी सांगितल आहे. जाट आरक्षणावरुन जे काही झाल ते निषेधार्ह असून हिंसेची काही गरज नव्हती असं मत वैंकय्या नायडू यांनी व्यक केलं आहे.