नवी दिल्ली - जेएनयूची विद्यार्थिनी आणि विद्यार्थी संघाच्या माजी नेत्या शेहला रशिद काश्मीर प्रकरणी केलेल्या खोट्या आणि वादग्रस्त ट्विटमुळे अचडणीत येण्याची शक्यता आहे. शेहला रशिद हिने काश्मीरमधील परिस्थितीवरून केलेले आरोप भारतीय लष्कराने काल फेटाळून लावले होते.दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयामधील वकील अलख आलोक श्रीवास्तव यांनी खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याप्रकरणी शेहरा रशिदविरोधात फौजदारी तक्रार दाखल केली आहे. तसेच शेहला रशिद यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी श्रीवास्तव यांनी केली आहे. शेहला रशिद ही स्वत: काश्मिरी असून, श्रीनगर येथील रहिवासी आहे. केंद्र सरकारने कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतल्यापासून ती सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. दरम्यान, रविवारी शेहला हिने एकापाठोपाठ एक खोटे ट्विट करून काश्मीरमध्ये परिस्थिती चिंताजनक असल्याचा दावा केला होता. तसेच लष्कर आणि पोलीस घरांमध्ये घुसून स्थानिकांना त्रास देत आहेत. तसेच शोपियाँ येथे लष्कराने काही जणांना जबरदस्तीने ताब्यात घेऊन त्रास दिल्याचा आरोप शेहला रशिद यांनी केला होता. मात्र हे आरोप लष्कराने तत्काळ फेटाळून लावले.
काश्मीरबाबत खोटे ट्विट्स केल्याने विद्यार्थी नेत्या शेहला रशिद अडचणीत, अटकेची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 1:07 PM