नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नवीन वादामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी विद्यापीठाच्या कुलगुरुंना विद्यार्थ्यांनी कोंडून ठेवल्याचा वाद समोर आला आहे. मात्र कुलगुरुंना कोंडून ठेवल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी फेटाळून लावला आहे. विद्यापीठानं 75 टक्के सक्तीच्या हजेरीसहीत अनेक नियमांचं परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकात मांडण्यात आलेले नियम विद्यार्थ्यांना मान्य नाहीत. यामुळे संबंधित नवीन नियम रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी गुरुवारी ( 15 फेब्रुवारी ) रात्रीपासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष गीतानं दिली आहे. गुरुवारी (15 फेब्रुवारी) सकाळपासूनच विद्यार्थी संघटनेनं कुलगुरुंची भेट घेण्यासाठी तीन वेळा अॅडमिन डिपार्टमेंटकडे पत्र व्यवहार केला. मात्र कुलगुरुंनी भेटीची वेळ न दिल्याचं विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष गीतानं सांगितले.
जारी करण्यात आलेले नवीन नियमांचं परिपत्रक रद्द करा, अशी मागणी मागणी विद्यार्थ्यांना कुलगुरुंना भेटून करायची होती. यावेळी कुलगुरू अॅडमिन डिपार्टमेंटमध्येच उपस्थित होते. मात्र तरीही त्यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली नाही. दरम्यान, गुरुवारी रात्री 11 वाजता अॅडमिन डिपार्टमेंटमधील एका आजारी कर्मचा-याला अॅम्ब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्याची माहिती समोर आली. यानंतर विद्यार्थी संघटना आणि विद्यार्थ्यांनी डिपोर्टमेंटची तपासणी केली असता, कुलगुरू तेथे नसल्याची बाब उघडकीस आली. कुलगुरू डिपार्टमेंटमधून कधी आणि कसे बाहेर पडले, याची माहिती कोणालाही लागली नाही, असेही गीतानं सांगितलं. दरम्यान, विद्यार्थ्यांनी कुलगुरुंना खोलीत कोंडून ठेवल्याचा आरोप विद्यार्थी संघटनेनं फेटाळून लावला.