नवी दिल्ली: जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. जेएनयू कॅम्पसमधील अनेक इमारतींवर ब्राह्मण आणि बनियाविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. भिंतींवर ब्राह्मण आणि बनिया समाजाने निघून जावे, अन्य़ता रक्तपात होईल, आम्ही बदला घेऊ, अशाप्रकारच्या घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. फुटीरतावादी घटकांनी स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजच्या इमारतीचीही तोडफोड केली आहे. ही घटना समोर आल्यानंतर जेएनयूमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यांच्या घरून सतत फोन येत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. घाबरलेले पालक आपल्या मुलांना घरी परतण्यास सांगत आहेत.
जेएनयूच्या भिंतींवर ब्राह्मण आणि बनियांच्या विरोधात जातीयवादी घोषणा लिहिल्यानंतर चांगलाच गोंधळ झाला आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर शांतीश्री डी पंडित यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. जेएनयू प्रशासनानेही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. ते म्हणाले, 'कॅम्पसमधील अशा फुटीरतावादी कारवाया अजिबात खपवून घेतल्या जाणार नाहीत, जेएनयू सर्वांचे आहे. जेएनयू टीचर्स फोरमनेही याविरोधात संताप व्यक्त केला आहे. त्यांनी स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज (SIS) चे डीन आणि तक्रार समितीला तपास पूर्ण करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
नेमकं काय प्रकरण आहे?गुरुवार(01 डिसेंबर 2022) रोजी अज्ञात लोकांनी JNU कॅम्पसमध्ये विविध ठिकाणी भिंतींवर ब्राह्मणविरोधी घोषणा लिहिल्या. 'ब्राह्मण आणि बनिया परिसर सोडा', 'आम्ही तुमच्यासाठी येत आहोत', 'शाखेत परत जा', 'आम्ही बदला घेऊ', 'रक्तपात होणार' अशा काही घोषणा सर्व भिंती आणि दरवाजांवर लिहिण्यात आल्या आहेत. या फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जेएनयू टीचर्स फोरमने ट्विटरवर काही फोटोही शेअर केले आहेत.
अभाविपकडून निषेधभिंतींवर अशा घोषणा लिहिण्याचे काम डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांचे असल्याचे आरएसएसची विद्यार्थी शाखा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे म्हणणे आहे. याआधीही अशी प्रकरणे समोर आली होती, मात्र यावेळी हे प्रकरण अधिकच वाढल्याचे सांगण्यात येत आहे. ज्युनिअर विद्यार्थी सतत त्यांच्या सीनिअर्सना फोन करून कॅम्पसच्या सुरक्षेबाबत प्रश्न विचारत असतात. एबीव्हीपी जेएनयूचे अध्यक्ष रोहित कुमार याने घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.