जेएनयूचे कुलगुरू जगदीशकुमार हेच हल्ल्यामागील मास्टरमाइंड; काँग्रेसचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 02:22 AM2020-01-13T02:22:58+5:302020-01-13T02:23:50+5:30
काँग्रेसच्या सत्यशोधन समितीचा आरोप; कारवाई करण्याची मागणी
नवी दिल्ली : जेएनयूचे कुलगुरू एम. जगदीशकुमार हेच त्या विद्यापीठात ५ जानेवारी रोजी झालेल्या हिंसक हल्ल्यामागील मास्टरमाइंड असून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसच्या सत्यशोधन समितीने केली आहे.
जेएनयू हल्ल्यामागील सत्य शोधून काढण्यासाठी काँग्रेसने चार जणांची समिती नेमली होती. या समितीच्या सदस्या व महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सुष्मिता देव यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, जेएनयूतील साबरमती हॉस्टेल, पेरियर हॉस्टेल व विद्यापीठातील अन्य ठिकाणी झालेल्या हल्ल्यांचे कारस्थान रचल्याबद्दल कुलगुरू एम. जगदीशकुमार, विद्यापीठाची सुरक्षाव्यवस्था सांभाळणारी कंपनी तसेच काही प्राध्यापकांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी. कुलगुरूंना तत्काळ बडतर्फ केले जावे. २०१६ साली कुलगुरूपदी निवड झाल्यापासून एम. जगदीशकुमार यांनी जेएनयूमध्ये प्राध्यापकपदावर पुरेशी पात्रता व गुणवत्ता नसलेल्या काही लोकांची नियुक्ती केली आहे. उजव्या विचारसरणीच्या असलेल्या प्राध्यापकांनाच बढत्या देण्यात आल्या आहेत. या नियुक्त्यांची चौकशी झाली पाहिजे. कुलगुरूंच्या भोंगळ कारभारामुळे जेएनयूमध्ये अराजक माजले आहे. ते आपले निर्णय योग्य प्रक्रियेचा अवलंब न करता विद्यार्थी व प्राध्यापकांवर लादतात.
सुष्मिता देव यांनी सांगितले की, हल्लेखोरांना रोखण्यासाठी विद्यापीठ प्रशासन व दिल्ली पोलिसांनी नेमकी काय पावले उचलली हे सर्वांना कळले पाहिजे. हल्ले होत असताना जेएनयूतील विद्यार्थ्यांनी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर दिल्लीचे पोलीस आयुक्त व अन्य अधिकाऱ्यांनी नेमके काय निर्णय घेतले हेही उजेडात आले पाहिजे. या सर्वांनी हल्लेखोरांना मदतच केली हे प्राथमिक पुराव्यांवरून स्पष्ट होते असे काँग्रेसच्या सत्यशोधन समितीचे मत आहे. जेएनयूमधील हॉस्टेलची फीवाढ तात्काळ रद्द करावी, अशी मागणीही त्यांनी केली. उजव्या विचारसरणीच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनीच जेएनयूमध्ये हल्ला केला व तो पूर्वनियोजित होता असे मानण्यास सबळ पुरावा आहे. काँग्रेसच्या सत्यशोधन समितीत सुष्मिता देव, हिबी एडन, सय्यद नासीर हुसैन, अमृता धवन यांचाही समावेश होता.
आणखी सात संशयित हल्लेखोरांचा घेतला शोध
जेएनयू हल्ला प्रकरणाची चौकशी करणाºया दिल्ली पोलिसांच्या एसआयटीने आणखी सात संशयित हल्लेखोर शोधून काढले आहेत. हल्ल्याच्या व्हिडिओ फिती, छायाचित्रे यांच्या तपासणीतून या हल्लेखोरांची ओळख पटविण्यात आली. त्यासाठी वॉर्डन, सुरक्षारक्षक व पाच विद्यार्थ्यांचे जबाब नोंदविण्यात आले. दिल्ली पोलिसांनी याआधी नऊ संशयित हल्लेखोरांची छायाचित्रे प्रसिद्ध केली असून त्यामध्ये जेएनयू विद्यार्थी संघाच्या अध्यक्ष आयशी घोष यांचा समावेश आहे. डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला घडवून आणल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी याआधी केला होता.