सुरेश भटेवरा, नवी दिल्लीआंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातकीर्त असलेल्या दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कुलगुरूपदी भाजपचे ज्येष्ठ नेते, अर्थतज्ज्ञ व माजी केंद्रीय मंत्री सुब्रह्मण्यम स्वामी यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणींची दोन दिवसांपूर्वीच स्वामींशी भेट झाली. पाठोपाठ त्यांच्या मंत्रालयाने स्वामींच्या नावाचा प्रस्ताव तयार केला. जेएनयुचे विद्यमान कुलगुरू प्रा.एस.के.सोपोरी यांच्या कारकीर्दीची मुदत येत्या जानेवारी महिन्यात संपेल. त्यांच्या जागी स्वामींच्या नियुक्तीचे रा.स्व.संघानेही जोरदार समर्थन केले आहे, अशी माहिती मंत्रालय व जेएनयूच्या विश्वसनीय सूत्रांकडून समजली.डाव्या विचारसरणीच्या संघटनांचा जेएनयू हा दिल्लीतला प्रमुख तळ मानला जातो. दिल्लीत म्हणूनच त्याला शैक्षणिक क्षेत्रातला ‘लाल किल्ला’ म्हणतात. डाव्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी स्वामींची कुलगुरूपदी नियुक्ती हा जेएनयू कँपसमध्ये उजवी विचारसरणी रूजवण्याचा धाडसी प्रयोग आहे. तथापि हे पद सहजासहजी स्वीकारण्यास स्वामी तयार नाहीत. मनुष्यबळ मंत्रालयाला त्यांनी आपल्या विशेष शर्ती कळवल्या आहेत. जेएनयूच्या कुलगुरूपदाचा कार्यभार सांभाळतांना, सरकारी नोकरशहांच्या लॉबीचा आपल्या कामकाजात अडथळा नको, यासाठी राज्यसभा सदस्यत्वासह कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जाही स्वामींना हवा आहे. नोकरशहांना थेट आदेश देण्यासाठी या पदाची उपयुक्तता अधिक असल्याचे त्यांचे मत आहे, असे समजले.रा.स्व.संघाच्या आग्रहामुळे पुण्यात फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युटच्या प्रमुखपदी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती झाली. इन्स्टिट्युटच्या विद्यार्थ्यांनी या नियुक्तीच्या विरोधात संप केला. नुकतेच या लक्षवेधी संपाने १00 दिवस पूर्ण केले. संपूर्ण प्रकरणात केंद्र सरकारची बरीच नाचक्की झाली. किमान त्याची पुनरावृत्ती जेएनयु सारख्या संवेदनशील विद्यापीठाच्या कुलगुरूपदाच्या नियुक्तीत होऊ नये, याची काळजी घेण्याचा सल्ला भाजपच्या काही ज्येष्ठ हितचिंतकांनी मोदी सरकारमधल्या उच्चपदस्थांना दिला आहे.स्वामींचे राजकीय व्यक्तिमत्त्व मुळात वादग्रस्त आहे. कोणाबरोबरही स्थिर राहण्याचा त्यांचा स्वभाव नाही. जेएनयूची स्थापना ज्या धोरणात्मक उद्देशाने झाली त्यावर आपल्या विचारसरणीचा प्रभाव निर्माण करण्याच्या खटाटोपात, विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय दर्जावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी स्वामी सुयोग्य कुलगुरू ठरतील, असे मनुष्यबळ मंत्रालय व रा.स्व. संघाला वाटते. मात्र ही प्रस्तावित नियुक्ती वादग्रस्त ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
‘जेएनयू’ कुलगुरूपदी सुब्रह्मण्यम स्वामी?
By admin | Published: September 23, 2015 10:41 PM