नवी दिल्ली: जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) हिंसाचाराच्या प्रकरणात दिल्लीपोलिसांनी हल्लेखोरांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये पोलिसांना नऊ जणांची ओळख पटवली असून जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आइशी घोषसह जेएनयूचा माजी विद्यार्थी चुनचुन कुमार, सुचेता आणि प्रिया रंजन यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देण्यात आली आहे.
पोलिसांनी जारी केलेल्या यादीमध्ये चुनचुन कुमार, पंकज मिश्रा, आइशी घोष, वास्कर विजय, सुजेता तालुकदार, प्रिया रंजन, डोलन सावंत, योगेंद्र भारद्वाज, विकास पटेल या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे डीसीपी जॉय टिर्की म्हणाले की, जेएनयूमधल्या हिंसाचार प्रकरणी अनेक प्रकराची चुकीची माहिती पसरवली गेली. SFI, AISA, AISF आणि DSF या विद्यार्थी संघटनांनी काही विद्यार्थ्यांना परीक्षेचं रजिस्ट्रेशन करण्यापासून रोखलं. या विद्यार्थ्यांना धमकावले जात होते. यानंतर हिंसाचार वाढत गेला व 5 जानेवारी रोजी पेरियार आणि साबरमती वसतिगृहातील काही खोल्यांवर करण्यात आलेला हल्ला पूवनियोजित असल्याचे टिर्की यांनी सांगितले. तसेच काही व्हॉट्स अॅप ग्रुपही तयार करण्यात आले होते. मास्क लावून ज्यांनी हल्ले घडवले त्यांना ठाऊक होतं की कुठे हल्ले करायचे व कोणत्या खोल्या फोडायच्या हे ठरवलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याचप्रमाणे यासंदर्भात आम्ही आत्तापर्यंत ३० ते ३२ साक्षीदारांशी चर्चा केली आहे असंही जॉय टिर्की यांनी स्पष्ट केलं.
पोलिसांनी आइशी घोषवर आरोप केल्यानंतर मी कोणतीही चूक केली नसून माझी खुशाल चौकशी करा असं आइशी म्हणाली. तसेच माझ्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याचे माझ्याकडेही पुरावे आहेत असं देखील आइशी घोषने सांगितले आहे.