ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. १२ - जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील प्राध्यापकाने कॅम्पसमधील दलित आणि मुस्लिम शिक्षक देशविरोधी असल्याचं म्हणलं आहे. या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. अगोदरच देशविरोधी घोषणा दिल्यामुळे कन्हैय्या कुमार आणि उमर खालीदच्या अटकेमुळे जेएनयू चर्चेत आहे.
एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत प्राध्यापकांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जेएनयूमधील किती शिक्षक आणि विद्यार्थी देशविरोधी आहेत ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर 'मोजून 10 शिक्षक आहेत मात्र सगळेच विद्यार्थ्यांसोबत असल्याचं दाखवल जात आहे. तुम्हाला वाटत का कोणत्याही संस्थेतील आणि त्यातही जेएनयूसारख्या ठिकाणी देशविरोधी घोषणा देणा-यांचं समर्थन केलं जाईल ?, फक्त 4 ते 5 जण समर्थन करत आहेत आणि ते सगळे मुस्लिम आणि दलित आहेत' असं उत्तर या प्राध्यापकाने दिलं आहे.
राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाने 8 मार्चला याप्रकरणी जेएनयूचे कुलगुरू आणि दिल्ली पोलीस आयुक्तांना नोटीस पाठवली आहे. 5 दिवसांत याप्रकरणी अहवाल देण्याची मागणी या नोटीसद्वारे करण्यात आली आहे. 'हा मुद्दा गंभीर आहे, जर हे खरं असेल तर गुन्हा नोंद होण्याची गरज आहे. पोलीस आम्हाला तपासानंतर माहिती देतील', असं राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष पी एल पुनिया यांनी सांगितलं आहे.