नवी दिल्ली - नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार आता राष्ट्रीय राजकारणात आपलं नशीब आजमावताना दिसणार आहे. आज तकच्या वृत्तानुसार , 2019 मध्ये कन्हैय्या कुमार लोकसभेची निवडणूक लढवणार आहे. कन्हैय्या कुमार सीपीआयच्या तिकिटावर बिहारमधील बेगुसराय लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. बेगुसरायमधून कन्हैय्या कुमारनं निवडणूक लढवावी, यावर सर्व डाव्या संघटनांचं एकमत झाल्याची देखील माहिती समोर आली आहे.
बिहारमधील सीपीआयचे महासचिव सत्यनारायण सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्हैय्या कुमारने बेगुसराय येथून लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत पाटणापासून ते नवी दिल्लीपर्यंतच्या डाव्या संघटनांमध्ये एकमत झाले आहे. काँग्रेस, राजद आणि डाव्या संघटना या महाआघाडीचा कन्हैय्या कुमार उमेदवार असेल. दरम्यान, कन्हैय्या कुमारच्या उमेदवारीवर लालू प्रसाद यादव यांच्याकडूनही समर्थन दर्शवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र दुसरीकडे निवडणूक लढवण्याबाबत अद्यापपर्यंत कन्हैयाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
सध्या बेगुलसराय लोकसभा मतदारसंघात भाजपाचं वर्चस्व आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे भोला सिंह येथून विजयी झाले होते. त्यांनी प्रतिस्पर्धी असलेल्या आरजेडीचा उमेदवार तनवीर हसन यांचा जवळपास 58000 मतांनी पराभव केला होता.
(संविधान हाच आमचा चेहरा; हाच चेहरा घेऊन आगामी निवडणुका लढवू : कन्हैयाकुमार)
दरम्यान, काही दिवसांपूर्वी कन्हैया कुमारनं म्हटले होते की, संविधान हाच आमचा चेहरा असून, हाच चेहरा घेऊन आम्ही आगामी निवडणुका लढवून भाजपसारख्या मनुवादी पक्षाला हरवू. औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्यानं हे विधान केले होते.