उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या काळात 'जो राम को लाये हैं' गाऊन जबरदस्त प्रसिद्धी मिळवलेल्या कन्हैया मित्तल यांनी आता यू-टर्न घेत काँग्रेसमध्ये जाण्यास नकार दिला आहे. चाहत्यांच्या टीकेनंतर त्यांनी हा निर्णय घेतला. मित्तल यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर व्हिडिओ शेअर करत चाहत्यांची माफी मागितली आहे. तसेच, आपण सनातनी लोकांचे ऐकू आणि त्यांचीच निवड करू, असे म्हटले आहे.
तत्पूर्वीर, आगामी हरियाणा विधानसभा निवडणुकीत पंचकुला मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लढण्याची कन्हैया मित्तल यांची इच्छा होती. मात्र भाजपने येथून पुन्हा एकदा जुने नेते ज्ञानचंद यांना उमेदवारी दिली. यानंतर मित्तल यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. एवढेच नाही तर, आपण लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहोत, असेही ते म्हणाले होते.
सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत कन्हैया मित्तल म्हणाले, "मी गेल्या दोन दिवसांपासून बघत आहे की आपण सर्व जण चिंतित आहात. त्यासाठी मी क्षमा मागतो आणि काँग्रेसमध्ये जात असल्याचे जे वक्तव्य केले होते, ते मागे घेतो. कारण कुण्याही सनातनी व्यक्तीचा विश्वास उडावा अशी माझी इच्छा नाही. आज मी तुटलो तर, माहीत नाही आणखी किती तुटतील. आपण सर्वजण रामाचे होतो, रामाचे आहोत आणि रामाचेच राहू. आपल्या सर्वांचा क्षमाप्रार्थी आहे."
5 ऑक्टोबरला हरियाणात निवडणुका -हरियाणातील सर्वच्या सर्व 90 जागांवर एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. यापूर्वी येथे, 1 ऑक्टोबरला मतदान आणि 4 ऑक्टोबरला मतमोजणी होणार होती. मात्र, नंतर मतदानाची तारीख 5 ऑक्टोबर तर काउंटिंग ची तारीख 8 ऑक्टोबर करण्यात आली. हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ 3 नोव्हेंबर 2024 ला संपणार आहे.