रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही दिवाळी आनंदाची बातमी घेऊन येत आहे. कारण यावेळची दिवाळी रोजगाराची असणार आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात हजारो नोकऱ्यांची घोषणा करणार आहेत. विशेष म्हणजे, पुढील वर्षातील डिसेंबर अखेरपर्यंत 10 लाख नोकऱ्या तयार केल्या जातील, असे पंतप्रधान मोदी यांनी जूनमध्येच म्हटले होते.
माध्यमांतील वत्तांनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 ऑक्टोबरला म्हणजेच दिवाळीच्या दोन दिवस आधी, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने तरुणांशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते तब्बल 75 हजार तरुणांना रोजगाराचे गिफ्ट देणार आहेत. महत्वाचे म्हणजे, विविध मंत्रालये आणि सरकारी खात्यात 75 हजार तरुणांना नियुक्तीपत्रे दिली जाणार असल्याचे समजते.
कुठे-कुठे मिळाणार नोकऱ्या? -यात तरुणांसाठी संरक्षण मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, पोस्ट विभाग, गृह मंत्रालय, कामगार आणि रोजगार मंत्रालय, CISF, CBI, कस्टम, बँकिंग यासह इतर अनेक क्षेत्रांमध्ये नोकऱ्या जाहीर केल्या जातील. देशातील अनेक केंद्रीय मंत्रीही या कार्यक्रमात सहभागी होतील.
हे मंत्री होणार सहभागी- या कार्यक्रमात ओडिशाचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, गुजरातचे आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया, चंदीगडमधून माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, महाराष्ट्राचे पीयूष गोयल, राजस्थानचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, तामिळनाडूच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन, उत्तर प्रदेशचे अवजड उद्योग मंत्री महेंद्र पांडे, झारखंडचे आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा, बिहारचे पंचायती राज मंत्री गिरिराज सिंह उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय, इतरही काही मंत्री वेग-वेगळ्या शहरांतून कार्यक्रमात भाग घेणार आहेत. तसेच सर्व खासदार आपापल्या कार्यक्षेत्रातून सहभागी होणार आहेत.