ऑनलाइन लोकमत
राजकोट, दि. 21 - जगातील दुस-या क्रमांकावर असणा-या गुंतवणूक बँकेतील लठ्ठ पगाराची नोकरी सोडणं हा सोपा निर्णय नाही. गौरव पंडित आणि त्यांची पत्नी शितल दोघेही न्यूयॉर्कमधील गोल्डमॅन सॅच्समध्ये कामाला होते. सर्व सुखसुविधा आणि लठ्ठ पगार असतानाही दोघांनी नोकरीवर पाणी सोडलं. यामागचं कारण सांगितलं तर तुम्हीदेखील आश्चर्यचकित व्हालं. फक्त आणि फक्त आपल्या मुलीला मातृभाषा गुजराती शिकता यावी या एका कारणासाठी दोघांनी नोकरीवर पाणी सोडलं.
या दांपत्याला 18 महिन्याच्या मुलीसोबत आपल्या गावी भावनगरमध्ये राहून तिला मातृभाषेचं शिक्षण द्यायचं होतं. अमेरिकेत 15 वर्ष नोकरी केल्यानंतर गौरव आणि शितल 2015 मध्ये भावनगरमध्ये राहण्यासाठी आले. एकूण 18 महिने ते तिथे राहत होते, जोपर्यंत ताशीने गुजराती बोलण्यास सुरुवात केली होती. या 18 महिन्यांमध्ये गौरव आणि शितल यांनी कोणतंच काम हाती न घेतला संपुर्ण वेळ ताशीसाठी देण्याचा निर्णय घेतला होता.
दोघांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला असून याबद्दल त्यांना कोणतीही खंत नाही. 21 फेब्रुवारीला जेव्हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस पार पडला तेव्हा गौरव पंडित आणि शितल यांची मुलगी ताशीने स्पष्ट गुजराती भाषेत संवाद साधला तेव्हा त्यांची छाती अभिमानाने फुलली होती.
'तिला आपलं मूळ माहिती व्हावं, तसंच कुटुंबासोबर राहायला मिळावं हा यामागचा मुख्य उद्देश होता. तिला कुटुंबाकडून खूप प्रेम मिळालं. पारंपारिक जेवणाचाही ती आनंद घेत होती. तिला आम्ही महत्वाच्या ठिकाणी फिरायला नेलं. तिने पहिल्या पावसाचा आनंद घेतला, तसंच दिवाळीत रांगोळीही काढली. आमच्या या प्रवासात आपल्या संस्कृतीचं बीज तिच्यात रोवलं गेलं आहे जे तिच्यासोबत कायम राहिल', असं गौरव यांनी सांगितलं आहे.
गौरव सध्या गुगलसोबत काम करत असून शितल एका आंतरराष्ट्रीय सल्लागार कंपनीत कामाला आहे. ताशीला सध्या ज्युनिअर केजीमध्ये प्रवेश मिळाला असून ती चायनीजदेखील शिकत आहे.