नवी दिल्ली : १० लाख लोकांना नोकऱ्या देण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘रोजगार मेळाव्या’चा प्रारंभ केला. पहिल्या टप्प्यात ७५ हजार युवकांना नोकरीची नियुक्तिपत्रेही त्यांनी यावेळी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून वितरित केली. कोविड-१९ साथीनंतर अनेक देशांना भेडसावत असलेल्या आर्थिक संकटातून भारताला वाचविण्यासाठी सरकार विविध पातळ्यांवर उपाययोजना करीत आहे, असे मोदी यांनी सांगितले.
मेळाव्यास मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केले. हा मेळावा एक महत्त्वाचा मैलाचा दगड असल्याचे त्यांनी म्हटले. तरुणांना जास्तीत जास्त नोकऱ्या देण्यासाठी सरकार आठ वर्षांपासून काम करीत असल्याचे नमूद केले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जूनमध्ये सरकारची विविध खाती आणि मंत्रालयांना आगामी दीड वर्षात १० लाख लोकांची भरती करण्याची सूचना केली होती.
कोणत्या विभागात दिल्या नोकऱ्या? ज्या ७५ हजार लोकांना मोदी यांच्या हस्ते नियुक्तिपत्रे देण्यात आली, ते भारत सरकारच्या ३८ मंत्रालये व विभागांत रुजू होतील. गट अ व ब (सनदी), गट ब (बिगर सनदी) आणि गट क अशा विविध पातळ्यांवर ते काम करतील. त्यांना केंद्रीय सशस्त्र दलांचे जवान, उपनिरीक्षक, हवालदार, एलडीसी, स्टेनो, पीए, आयकर निरीक्षक आणि एमटी अशा विविध पदांवर घेण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे. त्यातील काहींना थेट मंत्रालये आणि विभागांनी भरती केले आहे. काहींच्या नियुक्त्या यूपीएससी, एसएससी आणि रेल्वे भरती बोर्डामार्फत केल्या गेल्या आहेत.
रेल्वे आणि संरक्षण क्षेत्रात सर्वाधिक नाेकऱ्यापंतप्रधानांनी यावेळी देशातील तरुणांसाठी राेजगार मेळाव्याचे उद्घाटन करून लाखाे तरुणांसाठी एक दालन उघडले आहे. पुढील १४ महिन्यांमध्ये केंद्र सरकारच्या ३८ विभागांमधील १० लाख रिक्त पदांसाठी भरती हाेणार आहे. ही भरती काेणत्या स्तरांसाठी आणि काेणत्या खात्यात हाेणार आहे, याबाबत माहिती जाणून घेऊया.
कोविड-१९ साथीनंतर जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती फारशी चांगली नाही, ही वस्तुस्थिती आहे. कित्येक मोठ्या अर्थव्यवस्था संघर्ष करीत आहेत. कित्येक देशांत महागाई आणि बेरोजगारी शिखरावर आहे. शतकातून एखाद्या वेळी येणाऱ्या साथीचे परिणाम १०० दिवसांत जात नाहीत. या संकटापासून आपल्या देशाला वाचविण्यासाठी सरकार नवीन पुढाकार घेत आहे. हे आव्हानात्मक काम आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान