बिहार लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेचा अंतिम निकाल २६ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. यामध्ये सीतामढी जिल्ह्यातील उज्ज्वल कुमार उपकार यांनी टॉप केलं आहे. तो जिल्ह्यातील रायपूर गावचा रहिवासी आहे. उज्ज्वल कुमार यांची ही यशोगाथा एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणाची गोष्ट आहे. त्यांचे वडील सुबोध कुमार गावातील मुलांना शिकतात आणि आई अंगणवाडी सेविका आहे.
डीएसपी झाल्यानंतर उज्ज्वल कुमार म्हणाले की, माझी निवड होईल यावर माझा विश्वास होता, पण नंबर-१ रँक मिळाली आहे. यावर माझा अजिबात विश्वास बसत नव्हता. ते सध्या ब्लॉक कल्याण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
BPSC टॉपर उज्ज्वल कुमार यांना त्यांचे जुने दिवस आठवले. जेव्हा मी दहावीत शिकत होतो तेव्हा काही नातेवाईक नेहमी म्हणायचे की, हा मुलगा शिकणार नाही. मी अभ्यास करायचो तरी म्हणायचे. इंजिनीअरिंगनंतर नोकरी सोडली तेव्हाही नातेवाईकांनी आई-वडिलांना खूप काही सुनावलं. पण माझ्या आई-वडिलांनी आणि भावंडांनी माझ्यावर विश्वास ठेवला असं उज्ज्वल यांनी म्हटलं आहे.
उज्वल कुमार हिंदी माध्यमात शिकून बीपीएससी टॉपर झाले आहेत. ते म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत एकही हिंदी माध्यमाचा विद्यार्थी बीपीएससी टॉपर झालेला नाही. अशाप्रकारे उज्ज्वल कुमार यांनी अशी कामगिरी केली आहे जी गेल्या दहा वर्षांत कोणीच करू शकलेलं नाही. त्यांच्यापासून अनेक तरुणांना प्रेरणा मिळत आहे.