राजस्थानमध्ये डॉक्टरांच्या निष्काळजीपणाची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुचामन येथील शासकीय रुग्णालयात सिझेरियन प्रसूतीदरम्यान महिलेच्या पोटात १५x१० आकाराचा टॉवेल डॉक्टरांकडूनच राहिल्याची भयंकर घटना घडली. प्रसूतीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच १ जुलैनंतर जवळपास ३ महिने महिलेला पोटदुखीचा त्रास होत होता. पण कोणत्याच डॉक्टरला यामागचं नेमकं कारण समजू शकलं नाही.
अजमेरमध्ये सीटी स्कॅन केल्यानंतर डॉक्टरांनी पोटात गाठ असल्याचं निदान केलं होतं. प्रचंड वेदना होत असलेली महिला आणि कुटुंबीय हे शेवटी एम्स जोधपूरला पोहोचले. जिथे शस्त्रक्रिया विभागाच्या डॉक्टरांनी सीटी स्कॅननंतर आतमध्ये काहीतरी वेगळंच असल्याचं सांगितलं. ऑपरेशन दरम्यान वापरलेला टॉवेल पोटात असलेला पाहून एम्सच्या डॉक्टरांनाही धक्का बसला. टॉवेल आतड्यांना चिकटला होता.
महिलेने तीन महिन्यांपासून अनेक औषधं घेतली होती. त्यामुळे तिच्या शरीराच्या इतर भागांनाही इजा झाली आहे. या प्रकरणी डिडवाना सीएमएचओने तपासासाठी तीन डॉक्टरांची समिती गठित केली होती पण कुटुंब समाधानी नाही. त्यामुळे त्यांनी आता न्यायासाठी राजस्थान उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू असल्याचे महिलेचे वकील रज्जाक हैदर यांनी सांगितले. कुचामन येथील रहिवासी असलेल्या महिलेला पोटदुखीमुळे अन्न खाणं शक्य नाही. आतडे खराब झाल्यामुळे पचनसंस्थेवर वाईट परिणाम झाला आहे. एम्सच्या डॉक्टरांनी पीडितेला पुढील तीन-चार महिने लिक्विड आहारासोबत हलका आहार घेण्याचा सल्ला दिला आहे.
जोधपूर एम्स रुग्णालयातील गॅस्ट्रो सर्जरीचे डॉ.सुभाष सोनी यांच्या नेतृत्वाखाली डॉ. सेल्वन कुमार, डॉ.वैभव वैष्णवी, डॉ.पीयूष वैष्णवी आणि डॉ.लोकेश अग्रवाल यांनी शस्त्रक्रिया केली. महिलेच्या आतड्यांमधून बाहेर आलेला टॉवेल टाकण्यासाठी कुटुंबाकडून प्लास्टिकचा बॉक्स मागवण्यात आला. डॉक्टरांनी टॉवेलचा एक तुकडा घेऊन तो तपासणीसाठी पाठवला आहे जेणेकरून त्यात ३ महिन्यांत वाढणारे बॅक्टेरिया आणि इतर गोष्टी तपासता येतील.