राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. चार दिवसांपूर्वी जोधपूरमध्ये आग लागून मोठी दुर्घटना घडल्याचं समोर आलं होतं. लग्न सोहळ्यात वरात निघण्याआधीच गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर तब्बल 60 पेक्षा जास्त लोक गंभीररित्या भाजले होते. सर्व जखमींना उपचारासाठी जोधपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काही जणांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. यानंतर आता जखमींपैकी 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
सिलिंडर स्फोटातील मृतांचा आकडा आता वाढून 22 वर गेला आहे. तसेच अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये नवरदेवाच्या आई-वडिलांचा देखील समावेश आहे. नवरदेवाच्या आईचा रात्री तर वडिलांचा सकाळी मृत्यू झाला आहे. तसेच मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा अधिक समावेश आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
लग्नाची जोरदार तयारी सुरू असताना सिलिंडरचा स्फोट
सिलिंडरच्या ब्लास्टने क्षणात होत्याचं नव्हतं झालं, एक हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाची जोरदार तयारी सुरू असताना अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ झाला होता. तर मंडपात असलेले लोक आगीत होरपळले. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. जोधपूरमधील भूंगरा गावात ही दुर्घटना घडली. आगीची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले होते.
22 जणांनी गमावला जीव
भूंगराचे रहिवासी असलेले सगत सिंह गोगादेव यांच्या मुलाचं गुरुवारी लग्न होतं. संध्याकाळी वरात येणार होती. त्यासाठी घरामध्ये पाहुणेमंडळी देखील होते. नातेवाईकांसाठी खास मेजवाणीचं आयोजन करण्यात आलं होतं. याच दरम्यान सिंलिंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत काही लोक गंभीररित्या होरपळले. सिलिंडर स्फोटमुळे घराचे छतही कोसळले. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत एकूण 22 जणांनी आपला जीव गमावला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"