येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन येणार असल्याचे सप्टेंबरमध्ये कळविण्यात आले होते. परंतु, बायडेन यांनी अचानक हा दौरा रद्द केला आहे. यामुळे बायडेन आता २६ जानेवारीला उपस्थित राहणार नाहीएत. यामुळे भारताला आता नव्या पाहुणा कोण असेल याचा शोध घ्यावा लागणार आहे.
अमेरिकेचे राजदूत रिचर्ड गार्सेटी यांनी सप्टेंबरमध्ये बायडेन येणार असल्याचे सांगितले होते. जी २० शिखर परिषदेच्या निमित्ताने गार्सेटी य़ांनी बाय़डेन २६ जानेवारीला भारताचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील असे म्हणाले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसे निमंत्रणही दिल्याचे सांगितले गेले होते.
२६ जानेवारीच्या आसपासच क्वाड देशांची परिषद आहे. परंतु, त्यावर अद्याप सर्व देशांची संमती झालेली नाहीय. या बैठकीची तारीखही पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.
गेल्या काही काळापासून अमेरिकन नागरिक असलेल्या खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येच्या प्रयत्नावरून अमेरिका आणि भारताचे संबंध तणावाचे आहेत. तसेच पुढील वर्षी अमेरिकेतही निवडणूक होणार आहे. दुसरीकडे इस्रायल-हमास युद्ध ही सुरु आहे. असे असले तरी बायडेन यांच्या नकाराचे कारण समजू शकलेले नाहीय. तसेच अधिकृतरित्या देखील जाहीर करण्यात आलेले नाहीय.