नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी जॉनसन अँड जॉनसन (Johnson and Johnson) कंपनीने आपल्या कोरोना व्हॅक्सीनला मंजुरी मिळण्यासाठी भारत सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता. पण, आता कंपनीने आपला प्रस्ताव परत घेतला आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या सूत्रांनी ही माहिती दिली. पण, कंपनीने हा प्रस्ताव परत घेण्याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
सध्या भारतात दोन कंपन्यांच्या व्हॅक्सीन उपलब्ध आहेत. पण, तरीदेखील व्हॅक्सीनचा साठा सर्वांसाठी पुरत नाहीये. यामुळेच भारताला परदेशी व्हॅक्सीन कंपन्यांवर मोठी आशा आहे. पण, आता यात जॉनसन अँड जॉनसन (Johnson Covid Vaccine) ने आपला प्रस्ताव परत घेतल्यामुळे भारताला मोठा झटका बसला आहे.
एप्रिलमध्ये दिला होता प्रस्तावअमेरिकेतील जॉनसन अँड जॉनसनने या वर्षी एप्रिल महिन्यात भारतात कोरोना व्हॅक्सीनच्या आपातकालीन वापराची मंजुरी मिळवण्यासाठी प्रस्ताव दिला होता. परंतु, त्यावेळेस अमेरिकेत लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी तयार होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर चाचण्या अचानक बंद करण्यात आल्या होत्या. आता कंपनीने आपला प्रस्ताव अचानक परत घेतल्यामुळे भारताला हा मोठा धक्का मानला जात आहे.