नवी दिल्ली - जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. दरम्यान, काँग्रेसमध्ये जाण्यापूर्वी कन्हैया कुमार याने पाटणामधील सीपीआयच्या कार्यालयामधील खोलीत असलेला एसी उतरवून नेला आहे. हा एसी कन्हैया कुमार आणि त्याचे सहकारी राहत असलेल्या खोलीत लावलेला होता. (Before joining the Congress, Kanhaiya Kumar removed the AC from the CPI's office)
कन्हैया कुमार याने सीपीआयच्या तिकिटावर गेल्या लोकसभा निवडणुकीत बेगुसराय मतदारसंघामधून निवडणूक लढवली होती. आता कन्हैया कुमार हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. मात्र सोमवारी कन्हैयाचे लोक सीपीआयचे कार्यालय असलेल्या जनशक्ती परिसरात आले आणि खोलीतून एसी काढून घेऊन गेले तेव्हा कन्हैया सीपीआयला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले.
तत्पूर्वी पाटणामध्ये सीपीआयच्या कुठल्याही नेत्याला याची माहिती नव्हती. सीपीआयचे ऑफिस इन्चार्ज इंदुभूषण वर्मा यांनी सांगितले की, त्या खोलीमध्ये त्यांचा माणूस राहत होता. दोन महिन्यांपूर्वी तो एसी काढून घेऊन गेला. तर सीपीआयचे नेते विजय मिश्रा यांनी सांगितले की, कन्हैया कुमार याने एसी घेऊन जाण्यासाठी पार्टीकडे परवानगी मागितली होती.
विजय मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार पक्षाने तेव्हा सांगितले की, ही तुमची संपत्ती आहे. तुम्ही ती घेऊन जाऊ शकता. तिथे कन्हैयाचा एक माणूस राहायचा. दोन महिन्यापूर्वी त्याने दुसरीकडे घर घेतले. तेव्हा खोलीत काही सामान होते, ते तो घेऊम गेला. आताही खोलील काही सामान आहे. मात्र काही हरकत नाही. कन्हैया कुमारने पक्षासाठी खूप काही केले आहे.
विजय मिश्रा म्हणाले की, ५० हजारांचा एसी घेऊन जाणे काही मोठी बाब नाही. हा एसी तर कन्हैया कुमारचा वैयक्तिक होता. कन्हैया सुरुवातीपासून डाव्या विचारांशी जोडला गेलेला आहे. त्याने विद्यार्थी राजकारणातील वाटचालही याच विचारसरणीमधून केली. बेगुसरायमधील ज्या विहाट गावाशी कन्हैयाचा संबंध आहे. तो गाव कम्युनिस्टांचा गड मानला जातो. त्याला बिहारचा लेलिनग्राड असेही म्हणतात.
२०१९ मध्ये कन्हैयाने सीपीआयच्या तिकिटावर बेगुसरायमधून भाजपा नेते गिरिराज सिंह यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र त्या निवडणुकीत कन्हैयाचा चार लाख मतांनी दारुण पराभव झाला होता.