सेंट पीटर्सबर्ग : भारताला रशिया अणुऊर्जा निर्मितीसाठी २५ हजार कोटी रुपयांचे कर्ज देणार आहे. भारताच्या सगळ्यात मोठ्या अणुऊर्जा निर्मितीच्या तामिळनाडूतील प्रकल्पाच्या पाच आणि सहा क्रमांकाच्या संच बांधणीचा खर्च ५० हजार कोटी रुपये असून, त्याचा निम्मा भाग रशिया कर्जरूपाने देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात गुरुवारी येथे झालेल्या वार्षिक शिखर भेटीत कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या दोन नव्या रिअॅक्टर्ससाठी उभय देशांत करारावर स्वाक्षरी झाली. या प्रकल्पातून प्रत्यक्ष वीज निर्मितीला सात वर्षे लागतील, असे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन आॅफ इंडियाचे (एनपीसीआयएल) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एस. के. शर्मा यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. संपूर्ण प्रकल्पासाठी ५० हजार कोटी रुपये खर्च येणार असून, पहिला संच ६६ महिन्यांनी तर त्यानंतर दुसरा संच सहा महिन्यांनी कार्यान्वित होईल. या रिअॅक्टर्सची बांधणी रशियाच्या न्यूक्लिअर कॉर्पोरेशनची शाखा रोसॅटोमकडून होईल. या प्रकल्पाचे स्वरूप ७० टक्के कर्ज व ३० टक्के हिस्सा असे असेल, असे शर्मा म्हणाले. रशियाचे सरकार भारताला बांधकामासाठी ४.२ अब्ज अमेरिकन डॉलरचे कर्ज उपलब्ध करून देईल. रशियाचे अत्यंत आधुनिक, विश्वासार्ह तंत्रज्ञान या बांधकामासाठी वापरले जाणार आहे. सेंट पीटर्सबर्ग डिक्लरेशनमध्ये राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक वर्तुळात द्विपक्षीय सहकार्य आणखी बळकट करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. व्यापारवृद्धीसाठी प्रोत्साहन, त्याच्या रचनेत सुधारणा आणि औद्योगिक सहकार्य विस्तारणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी म्हटले. (वृत्तसंस्था)क्षेपणास्त्र यंत्रणा...भारताला रशिया एस-४०० ट्रायंफ ही विमानविरोधी क्षेपणास्त्र व्यवस्था पुरवण्याची तयारी करीत आहे. दोन्ही देश या विक्री व्यवहाराच्या स्वरूपावर चर्चा करीत आहेत, असे रशियाचे उप पंतप्रधान दिमित्री रोगोझिन यांनी म्हटले. एस-४०० विमानविरोधी क्षेपणास्त्र सिस्टीम पुरविण्याच्या कराराच्या आधीची तयारी सध्या सुरू आहे. त्यासाठी नेमका किती वेळ लागेल, हे सांगता येणार नाही. त्यासाठी दोन्ही देशांत करार झालेला असून आम्ही त्यावर आता निव्वळ अटींची चर्चा करीत आहोत, असे रशियाची अधिकृत वृत्तसंस्था ‘तास’ने रोगोझिन यांचा हवाला देऊन म्हटले.उभय देशांत व्यापार आणि आर्थिक करारांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असून त्याचाच एक भाग म्हणून विमाने आणि स्वयंचलित वाहनांच्या निर्मितीसाठी संयुक्त प्रकल्प उभारण्याचे त्यांनी मान्य केले आहे.व्लादिमीर पुतीन यांनी मोदींशी चर्चा केल्यानंतर सांगितले की, ‘‘रशिया आणि भारत यांच्यातील आर्थिक सहकार्य वाढीच्या मार्गावर परतत आहे. हा सकारात्मक कल बळकट करणे हे दोन्ही देशांच्या हिताचे आहे. आमची चर्चा ही नेहमीच मित्रत्वाच्या वातावरणात व ठोस व उत्पादक झालेली आहे. ही चर्चादेखील त्याला अपवाद नाही.’’
विमान निर्मितीसाठी संयुक्त प्रकल्प
By admin | Published: June 03, 2017 1:31 AM