ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 27 - जवाहलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी आशुतोष कुमारला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेएनयूमध्ये देशद्रोही घोषणा दिल्याचा आशुतोष कुमारवर आरोप आहे. आशुतोष कुमारला वसंत विहार पोलिसांनी शुक्रवारी चौकशीसाठी बोलवले होते त्यानंतर आज शनिवारी सकाळी त्याची चौकशी करण्यात आली. आशुतोषची उद्यादेखील चौकशी केली जाणार असल्याची माहिती डीसीपी प्रेमनाथ यांनी दिली आहे.
9 फेब्रुवारीला जेएनयूमध्ये अफजल गुरुच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्याविरोधात देशद्रोहाचा आरोप लावण्यात आला आहे. ज्यामध्ये आशुतोष, रामा नागा आणि अनंत यांचादेखील समावेश आहे. या सर्वांनी काही दिवसांपुर्वी पोलिसांशी संपर्क साधून आम्हाला चौकशीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसंच आपले संपर्क क्रमांकदेखील दिले होते अशी माहिती अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा सुचेता यांनी दिली आहे. जेएनयू प्रकरणी अगोदरपासूनच कन्हैय्या कुमार, उमर खालीद आणि अनिर्बन भट्टाचार्य अटकेत आहेत.